![]()
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावर पहिल्याच पावसात दरड कोसळल्याने विरोधकांनी महायुती सरकारला चांगलेच कोंडीत पकडले आहे. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, आता इथून पुढे हा शेवटचा ट्रॅफिक असेल,’असे सांगत हा महामार्ग पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा केला होता. त्यांनी त्यावेळी राजकीय भूमिका मांडली होती, मात्र काल पुन्हा या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
पावसाने सरकारचे वाभाडे काढले- दानवे अंबादास दानवे म्हणाले की, मिसिंग लिंक 1 मे रोजी खुला झाला होता. अवघ्या 60 ते 65 दिवसामध्ये त्या रस्त्याचे काय हाल झाले हे आपण पाहतो आहोत. दोन दिवसाच्या पावसाने सरकारचे वाभाडे काढले आहेत. बोगद्यामध्ये ढबढबे सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी शोबाजी करण्याचे काम सुरू केले आहे. सरकार यावर गोल-गोल उत्तरं देतील. सरकार कंत्राटदारांना पोसण्याचे आणि जनतेच्या जीवाशी खेळण्याचे काम करत आहेत. कुठलंही डिझास्टर झालेले नाही- फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मिसिंग लिंकमध्ये बोगदा असो की काही इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेले नाही. जे झाले आहे ते समोरच्या भागात झाले आहे. या सर्व घटना निसर्गाचे चक्र बदलल्यामुळे घडत आहेत. प्रशासनाची पूर्ण तयारी होती, पण जिथे यापूर्वी कधीच दरड कोसळली नाही, तिथे ती कोसळली. यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करून सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत रस्त्यावरील 100 टनांचा ढिगारा बाजूला केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः रस्ता मोकळा झाल्याचा व्हिडीओ शेअर करत वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती दिली. ज्यांना भ्रष्टाचार करण्याची सवय होती त्यांना मनातून असे वाटते की यांच्या काळात का असे होत नाही म्हणून बेछूट आरोप करत असतात. केवळ टीका करणाऱ्या व्यक्तीना उत्तर द्यायचे नसते, ज्यांना काही समजते त्यांना उत्तर देत असतात. ज्यांनी एकही पुल बांधला नाही, महाराष्ट्राचा सत्यनाश केला ते लोकं आम्हाला प्रश्न विचारत आहेत. कमिशनमुळे चांगले काम नाही- राऊत संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री म्हणतात मिसिंग लिंकवर दोन खड्डे पडलेत, पण आज त्यांनी स्वतः जाऊन पाहावे; खड्डे सोडून द्या, तिथे अख्खा मिसिंग लिंकच कोसळला आहे. शिवसेना-भाजप युतीच्या काळात मुंबई-पुणे एक्सप्रेसवे आणि 56 पुलांसह विदर्भातील सर्व रस्ते झाले त्या काळात तुम्ही मंत्रीही नव्हतात. भाजप सरकार जे जे काम करते ते महिनाभरात कोसळते कारण ते कंत्राटदारांकडून कमिशन घेतात, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. नवयुगा-अॅफकॉनवर कारवाई होणार का? रोहित पवार रोहित पवार यांनी सांगितले की, प्रकल्पाचे उद्घाटन होऊन अवघे 2 महिने होत असताना बोगद्यात पाण्याची गळती, रस्त्यांवर तडे आणि दरड कोसळल्याच्या घटनांमुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच या प्रकल्पाचे कंत्राट नवयुगा आणि अॅफकॉन या कंपन्यांना देण्यात आल्याचे सांगत, “अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित प्रकरणात ज्या कंपनीचे नाव समोर आले होते, त्याच्याशी संबंध असलेल्या कंपनीलाच मिसिंग लिंकचे कंत्राट देण्यात आले सुमारे सात हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे कंत्राट नवयुगा आणि अॅफकॉन या कंपन्यांना देण्यात आले. नवयुगा कंपनीचा संबंध यापूर्वी अजित पवारांच्या अपघाताशी संबंधित चर्चेत आलेल्या व्हीएसआर कंपनीशी असल्याचा दावा त्यांनी केला. त्या प्रकरणातही संबंधितांवर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे आता मिसिंग लिंक प्रकल्पातील त्रुटींसाठी या कंपन्यांवर सरकार कारवाई करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
केवळ दरड कोसळली होती- बन मुंबई–पुणे कनेक्टिंग लिंकबाबत बोलताना नवनाथ बन म्हणाले की, बोगदा कोसळला नव्हता तर दरड कोसळली होती आणि ती अवघ्या 18 तासांत हटवून मार्ग नागरिकांसाठी पुन्हा खुला करण्यात आला. भ्रष्टाचार आणि कमिशनखोरी हा भाजपचा नव्हे तर विरोधकांचा स्वभाव आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला आणि मुंबई–पुणे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला. देशपांडेंनी उडवली सरकारची खिल्ली संदीप देशपांडे म्हणाले की, मिसिंग लिंकवर दरड कोसळली त्याला नेहरूच जबाबदार आहेत आणि तरीसुद्धा ज्यांना सरकारवर टीका करायची आहे त्यांनी पाकिस्तानला निघून जावे, अशी पोस्ट करत सरकारची खिल्ली उडवली आहे. मिसिंग लिंकवर दुर्घटना मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंकच्या क्षेत्रात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली होती. येथील 8.9 किलोमीटर लांबीच्या बोगद्याच्या अगदी शेवटी डोंगराचा प्रचंड मोठा भाग कोसळला. दरडीसोबतच तिथला एक भलामोठा सिमेंटचा पिलर थेट मुख्य रस्त्यावर आडवा झाला. या पिलरमध्ये लोखंडी रॉड आणि सिमेंटचे जड बांधकाम असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या दोन्ही लेन पूर्णपणे ब्लॉक झाल्या होत्या. कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प? द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगदा ते खंडाळा एक्झिट दरम्यानचा रस्ता सध्या सहा पदरी आहे. या ठिकाणी द्रुतगती मार्गाच्या 6 पदरी मार्गासोबत राज्य मार्गाच्या चार पदरी मार्गाची वाहतूक एकत्र येऊन एकूण 10 पदरी वाहतूक निर्माण होते. घाट विभाग असल्याने येथे चढ-उतार जास्त असून पावसाळ्यात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे मुंबईकडे जाणारी डोंगरालगतची एक लेन अनेकदा बंद ठेवावी लागते. या अडचणी दूर करण्यासाठी आणि अधिक सक्षित पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेण्यात आला. या अंतर्गत खालापूर ते खोपोली इंटरचेज दरम्यानच्या 5.86 किमी लांबीच्या 6 पदरी रस्त्याचे 8 पदरीकरण करण्यात आले आहे. तसेच खोपोली एक्झिट ते कुसगाव सिंहगड इन्स्टिट्यूट या 12.30 किमी लांबीच्या उर्वरित भागासाठी दोन बोगदे आणि दोन व्हायाडक्ट उभारण्यात आले आहेत. 5.88 किमीच्या 8 पदरी स्टीकरणासह एकूण 19.16 कि. मी. लांबीचा हा अत्याधुनिक मार्ग विकसित करण्यात आला आहे. जगातील सर्वाधिक रुंद बोगद्यांची निर्मिती या प्रकल्पातील दोन बोगद्यांची उभारणी न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग मेथड तंत्रज्ञानाद्वारे करण्यात आली आहे. प्रत्येकी 23.50 मीटर रुंदीचे हे बोगदे सहयादी पर्वतरांगांमध्ये खोदणे हे मोठे अभियांत्रिकी आव्हान होते. जगातील सर्वाधिक रुंदीचे बोगदे म्हणून यांची गिनीज बुकमध्ये होण्याकरिता प्रक्रिया सुरु आहे बोगद्यांमधील विविध प्रकारच्या खडकांचे भूगर्भशास्त्रीय परीक्षण करून आवश्यक ती दक्षता घेण्यात आली. बोगदा क्रमांक 1 ची लांबी 58 कि. मी. असून बोगदा क्रमांक 2 ची लांबी 8.86 कि. मी. आहे. विशेष म्हणजे, दुसरा बोगदा लोणावळा तलावाच्या पातळीपासून सुमारे 180 मीटर खाली आहे. त्यामुळे ब्लास्टिंगसारख्या कामांमध्ये मोठे तांत्रिक आव्हान होते; मात्र एमएसआरडीसीने ते यशस्वीरित्या पूर्ण केले.
टायगर व्हॅलीतील केबल-स्टेड ब्रिज अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना या दोन बोगद्यांना जोडणारा टायगर व्हॅलीतील 650 मीटर लांबीचा केबल-स्टेड ब्रिज हा या प्रकल्पाचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे. सुमारे 125 मीटर उंचीवर उभारण्यात आलेला हा पूल अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उत्कृष्ट नमुना आहे. 182 मीटर उंचीचे दोन पायलॉन (स्तंभ) आणि एकूण 240 केबल्सच्या सहाय्याने हा पूल उभारण्यात आला आहे. या पुलासाठी विंड टनेल टेस्ट’, ‘फॅटिंग व टेन्साइल टेस्ट’ तसेच ‘स्टे केबल टेस्टा अशा अत्याधुनिक चाचण्या विदेशात करण्यात आल्या आहेत. डोंगर-दऱ्यांनी वेढलेल्या या परिसरात महाकाय यंत्रसामग्री पोहोचविणे, तसेच वेगवान वारे आणि मुसळधार पावसात काम करणे ही मोठी आव्हाने होती. कमी दृश्यमानतेच्या परिस्थितीतही सर्व सुरक्षा उपाययोजना काटेकोरपणे पाळत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. या नव्या मार्गामुळे घाटातील अवघड वळणे आणि अपघातप्रवण क्षेत्र टाळता येणार असून प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. तसेच, वाहनांच्या इंधनाच्या वापरात घट होऊन दररोज अंदाजे 1 कोटी रुपयांची बचत होणार आहे. परिणामी, प्रदूषणातही लक्षणीय घट होण्यास मदत होणार आहे. राज्यातील पुढील विकासासाठी तसेच पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडा या भागांच्या प्रगतीसाठी मिसिंग लिंक प्रकल्प भविष्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. मिसिंग लिंक म्हणजे काय? ‘मिसिंग लिंक’ला अनेकवेळा एक तांत्रिक चमत्कार असे संबोधण्यात आले आहे. सह्याद्रीच्या पर्वत रांगात अशी महाकाय यंत्रसामग्री पोहोचवून बांधकाम करणे सोपी गोष्ट नव्हती. पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंगर दऱ्यांनी वेढलेल्या या भागात काम करणे फारच जिकिरीचे होते. पण त्यानंतरही हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला. दोन विभागलेल्या भागांना जोडणाऱ्या रस्त्यांना मिसिंग लिंक असे म्हटले जाते. लोणावळ्यातील घाट आणि डोंगरांनी विभागलेल्या भागाला मिसिंग लिंक जोडतो. प्रवाशांना काय फायदा वेळेची बचत: घाटातील वळणे आणि वाहतूक कोंडी बायपास झाल्याने प्रवासाचा वेळ 20 ते 30 मिनिटांनी कमी.
अंतर कमी होणार: या लिंकमुळे एक्स्प्रेस वेचे एकूण अंतर 6 किलोमीटरने कमी. टोलमध्ये वाढ नाही: सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या नवीन प्रकल्पामुळे प्रवाशांवर कोणताही अतिरिक्त टोल लादला जाणार नाही. खालापूर टोल नाक्यावरही सध्या कोणतीही दरवाढ प्रस्तावित नाही.
Source link