Headlines

खडकवासला धरण 76 टक्के भरले, मुठा कालव्यातून विसर्ग सुरू:पाणीपातळी वाढल्याने नदीपात्रात न उतरण्याचे प्रशासनाचे आवाहन




पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे धरणातील पाणीपातळीत वेगाने वाढ झाली असून, मंगळवारी धरण 76 टक्के क्षमतेने भरले आहे. वाढत्या पाणीपातळीमुळे नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात होत असलेला मुसळधार पाऊस आणि धरणात येणारा पाण्याचा वाढता ओघ पाहता, येत्या काही तासांतच धरण 80 टक्के किंवा त्याहून अधिक क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. यामुळे धरणाच्या मुख्य सांडव्यावरून मुठा नदीपात्रातही पाण्याचा विसर्ग सुरू केला जाऊ शकतो. खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी 12 वाजता नवीन मुठा कालव्यातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास परिस्थितीनुसार नदीपात्रातील विसर्ग वाढवला जाईल. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धरण क्षेत्रातून नदीपात्रात कधीही पाण्याचा विसर्ग वाढवला जाऊ शकत असल्याने, नागरिकांनी कोणत्याही कारणास्तव नदीपात्रात उतरू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नदीपात्रात किंवा नदीकाठच्या भागात कोणाचे काही साहित्य, वाहने अथवा पाळीव जनावरे असल्यास ती त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच, नदीकाठच्या आणि सखल भागातील रहिवाशांना त्वरित सतर्कतेच्या सूचना देऊन प्रशासकीय पातळीवर योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. पाटबंधारे विभाग धरण क्षेत्रातील आणि नदीपात्रातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, आवश्यक ती खबरदारी व दक्षता बाळगावी आणि पाटबंधारे विभागाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *