![]()
कोथरूड परिसरात विक्रीसाठी दोन पिस्तूल आणि जिवंत काडतुसे घेऊन आलेल्या २१ वर्षीय तरुणाला कोथरूड पोलिसांनी अटक केली. प्रेम देवेंद्र साळुंखे (वय २१, रा. म्हसोबा चौक, दत्तवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा सुमारे दीड लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १९ ऑगस्ट रोजी पोलीस कर्मचारी शकील पठाण आणि शिवप्रसाद दहिफळे यांना माहिती मिळाली की, कोथरूडमधील केळेवाडी परिसरात कुमार प्रॉपर्टीजच्या मोकळ्या जागेत पंपिंग स्टेशनजवळ एक संशयित तरुण उभा आहे. त्याच्या कंबरेत पिस्तूल असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या वर्णनानुसार पांढरा शर्ट आणि निळी जीन्स घातलेला तरुण तेथे आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्या कंबरेच्या मागील बाजूस लपवून ठेवलेली दोन पिस्तूल आढळली. त्यानंतर त्याच्या खिशाची झडती घेतली असता दोन जिवंत काडतुसे मिळून आली. चौकशीत साळुंखे याने ही पिस्तुले विक्रीसाठी आणल्याचे सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, पिस्तुले त्याने कोणाकडून मिळवली आणि ती कोणाला विकणार होता, याचा तपास सुरू आहे. यापूर्वीही तो बेकायदा शस्त्रांच्या खरेदी-विक्रीत सहभागी होता का, याचीही पोलिसांकडून पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र कायद्यासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर घुले करीत आहेत.
Source link
पुण्यात दोन पिस्तूल, काडतुसांसह तरुण अटकेत:विक्रीसाठी आणली होती शस्त्रे; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त