![]()
राज्यातील कोकण भागात तसेच इतर अनेक भागांमध्ये पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गालाही फटका बसला होता. मात्र या महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खवटी येथे पडलेली दरड बाजूला करण्यात आली असून सोमवारपासून या ठिकाणी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील पाणी ओसरले असून येथील वाहतुकही सुरू करण्यात आली आहे. कोकणातून कोल्हापूर किंवा पुण्याला जायचे असल्यास चिपळूण येथील कुंभर्ली घाट व संगमेश्वर तालुक्यातील साखरपा आंबा घाट हे दोन मार्ग सुरू आहेत. असे असले तरी कोकणातून पुण्याला जाणारे इतर सर्व रस्ते बंद झाले आहेत. आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद रायगड जिल्ह्यात भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा वाढता धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने पोलादपूर-महाबळेश्वर जोडणारा आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यासोबतच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून, माणगाव मार्गे पुण्याला जाणारा ताम्हिणी घाट आणि महाडवरून जाणारा वरंधा घाट हे दोन्ही मार्गही दरडी कोसळण्याच्या शक्यतेमुळे अत्यंत धोकादायक बनल्याने वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. दापोली-मंडणगड मार्ग संथ गतीने सुरू खेड तालुक्यातून नातूनगरमार्गे महाडला जाणाऱ्या रस्त्यावर विन्हेरे येथे पुन्हा एकदा मोठी दरड कोसळल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आंबे पुलावरूनही वाहतूक थांबवण्यात आली आहे. मुंबई आणि पुण्याहून दापोलीकडे येणाऱ्या पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला दापोली-मंडणगड मार्ग सुरू असला, तरी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्यावर चिखल साचल्याने येथील वाहतूक अतिशय संथगतीने सुरू आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबईहून कोकणात ये-जा करण्यासाठी सध्या टोळ फाटामार्गे दापोली, खेड आणि चिपळूण हे पर्यायी मार्ग सुरू ठेवण्यात आले आहेत. दुसरीकडे, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर आता ओसरला असून तेथून पश्चिम महाराष्ट्राकडे जाणारे सर्व घाटमार्ग वाहतुकीसाठी सुरळीत सुरू आहेत. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि कर्नाटक राज्याला जोडणारा सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-आजरा मार्ग, तिलारी घाट, तसेच वैभववाडीतून कोल्हापूरकडे जाणारा खारेपाटण-भुईबावडा घाट आणि कणकवलीजवळील फोंडा घाट या सर्व प्रमुख मार्गांवरून वाहतूक विनाअडथळा सुरू आहे.
Source link
कोकणात पावसाचे थैमान!:पुण्याकडे जाणारे बहुतांश घाट रस्ते बंद, जाणून घ्या कोणते मार्ग आहेत सुरू?