Headlines

पुणे पोलिसांकडून बिश्नोई गँगचे खंडणी रॅकेट उद्ध्वस्त:आंतरराज्य कारवाईत 4 आरोपी ताब्यात, 3 शस्त्रे जप्त




पुणे पोलिसांनी बिश्नोई गँगच्या खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. व्यावसायिक आणि उद्योजकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या या टोळीतील चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. ताब्यात घेतलेल्या चार आरोपींपैकी दोघांना पंजाबमधील भटिंडा येथून अटक करण्यात आली. हे आरोपी मूळचे सिरसा (हरियाणा) आणि हनुमानगड (राजस्थान) येथील रहिवासी असून, ते पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात राहत होते. या प्रकरणातील मुख्य संशयित आणि गोळीबार करणाऱ्या दोन व्यक्तींची ओळख पटली असून, त्यापैकी एकाला तीन दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. या गुन्हेगारांना पुण्यात स्थानिक पातळीवर मदत करणाऱ्या एका व्यक्तीलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेने आतापर्यंत आरोपींकडून तीन अग्नीशस्त्रे जप्त केली आहेत. हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आंतरराज्य मोहीम राबवली. पुण्यापासून सुरू झालेला हा तपास नाशिक, सुरत, अजमेर, गुजरात, राजस्थान, हरियाणा आणि पंजाबपर्यंत पोहोचला. तब्बल १५ दिवसांच्या कालावधीत पोलिसांनी ५,००० किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास केला आणि १,००० तासांपेक्षा जास्त वेळेचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. या यशस्वी कारवाईमध्ये गुन्हे शाखेची एकूण पाच पथके अहोरात्र काम करत होती. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले. हे आरोपी कोणाच्या सांगण्यावरून खंडणीसाठी फोन करत होते की त्यांनी स्वतःच्या पातळीवर हा कट रचला होता, याचा सखोल तपास सुरू आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक इशारा दिला की, “शहरातील कोणत्याही व्यावसायिकाला किंवा नागरिकाला दमबाजी सहन केली जाणार नाही; आम्ही हे रॅकेट पाळेमुळासकट उद्ध्वस्त करू.” या धडक कारवाईमुळे पुणे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *