![]()
महाराष्ट्रातील हजारो बाईक-टॅक्सी चालकांवर परिणाम करणारा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय आज विधानसभेत जाहीर करण्यात आला. राज्यात बाईक-टॅक्सीचा परवाना मिळवण्यासाठी यापुढे महाराष्ट्राचे डोमिसाईल (अधिवास प्रमाणपत्र) अनिवार्य असणार आहे. राज्यात वाढलेली अनधिकृत वाहतूक, महिलांच्या सुरक्षेचा निर्माण झालेला प्रश्न आणि परप्रांतीय चालकांचा वाढता सहभाग या सर्व गंभीर बाबींची दखल घेत, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात राज्य सरकारची ही नवीन नियमावली आणि भूमिका स्पष्ट केली. या महत्त्वपूर्ण प्रश्नाला शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांनी सभागृहात या संदर्भातील मुद्दा उपस्थित केला होता. रस्त्यांवर विनापरवाना धावणाऱ्या बाईक-टॅक्सींची संख्या झपाट्याने वाढत असून, यातील बहुतांश चालकांकडे वैध परवाना, आवश्यक कागदपत्रे किंवा पोलीस पडताळणी अहवाल नसल्याचा दावा त्यांनी केला. या बेकायदेशीर आणि अनियंत्रित प्रकारांमुळे महिला तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याचे निदर्शनास आणून देत, अशा अनधिकृत चालकांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आक्रमक मागणी आमदार लांडे यांनी केली. महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना यावर बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, राज्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढत आहे. परप्रांतातून अनेक जण महाराष्ट्रात येतात, बाईक खरेदी करतात आणि थेट वाहतुकीचा व्यवसाय सुरू करतात. हा प्रकार यापुढे सहन केला जाणार नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचे डोमिसाईल प्रमाणपत्र असेल, त्यांनाच वाहतुकीचा परवाना देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी वाढतील पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, या निर्णयामुळे बेकायदेशीर वाहतुकीवर आळा बसेल, प्रवाशांच्या सूर्यक्षेत सुधारणा होईल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या चालकांवर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल. यासोबतच स्थानिक युवक-युवतींसाठी रोजगाराच्या संधी वाढतील आणि शासनाच्या महसुलातही भर पडेल, असा दावाही सरनाईक यांनी केला आहे. दरम्यान, सरकारच्या या महत्त्वपूर्ण घोषणेनंतर बाईक-टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कंपन्या, सध्याचे चालक आणि या व्यवसायात नव्याने येऊ पाहणाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये बाईक-टॅक्सीचा वापर लक्षणीय असल्याने, आता या निर्णयाची नेमकी अंमलबजावणी कधी आणि कोणत्या नियमांच्या आधारे केली जाणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.
Source link
राज्यात बाईक-टॅक्सी परवान्यासाठी आता महाराष्ट्राचे 'डोमिसाईल' अनिवार्य:परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा