![]()
पुण्यात राहुल गांधींच्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमापूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हीपी) तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली असून, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांच्यासह एनएसयूआय आणि युवक काँग्रेसच्या सुमारे ५० ते ६० कार्यकर्त्यांना आरोपी करण्यात आले आहे. हा गुन्हा शुक्रवारी रात्री सीओईपी वसतिगृहात झालेल्या वादानंतर दाखल करण्यात आला. तक्रारदार मल्हार निलेश पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील एका विद्यार्थिनीवर दबाव टाकून तिचा व्हिडिओ जबाब घेतल्याचे त्यांना समजले होते. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटील काही सहकाऱ्यांसह वसतिगृहात गेले असता, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५(२), १८९(१), १८९(२), १९१(२), ३५१(२) आणि ३५२ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम ३७(३) व १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक अमर काळंगे या प्रकरणाचा तपास करत आहेत. राहुल गांधींच्या शनिवारी होणाऱ्या ‘छात्रों की गुंज’ कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला सीओईपी परिसरात काँग्रेस आणि एबीव्हीपी कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण झाला होता. दोन्ही बाजूंनी विद्यार्थिनींवर दबाव आणल्याचे आरोप एकमेकांवर केले आहेत. घटनेनंतर पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून, परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राहुल गांधींचा हा कार्यक्रम आज, २२ ऑगस्ट रोजी एसएसपीएमएस मैदानावर होणार आहे. पोलिसांनी आयोजकांना विविध अटींसह कार्यक्रमासाठी परवानगी दिली आहे. या कार्यक्रमाला हजारो विद्यार्थिनी उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे. या गुन्ह्यामुळे राहुल गांधींच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-भाजपमधील राजकीय संघर्षाला आणखी धार आली आहे. आजच्या कार्यक्रमाकडे राजकीय आणि पोलीस प्रशासनाचे विशेष लक्ष लागले आहे.
Source link
राहुल गांधींच्या सभेपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा:एबीव्हीपीच्या तक्रारीवरून 50-60 जणांवर शिवाजीनगर पोलिसांची कारवाई