![]()
राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण यांनी केले आहे. या दाव्यामुळे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचा नेमका दावा काय? नवी दिल्लीत बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर गंभीर आरोप करत पवारांच्या पक्षाबाबत चिंता व्यक्त केली. चव्हाण म्हणाले, “शरद पवार यांचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत, ते पुढे काय करतील हे मला माहिती नाही. मोदी-शहा सरकार आमच्या मागे हात धुवून लागले आहे. देशात विरोधी पक्ष अस्तित्वात नसावा, अशीच त्यांची इच्छा आहे. भाजपने जे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत केले, तेच आता पवार साहेबांच्या राष्ट्रवादीसोबत होऊ शकते. खासदार सोडून जातील की नाही हे निश्चित सांगता येत नाही, मात्र ते अस्थिर आहेत असे मी ऐकतोय.” बजरंग सोनवणेंचा पलटवार- “आम्ही आठही जण एकसंघ, ऑफरच्या पलीकडे!” पृथ्वीराज चव्हाणांच्या या दाव्यावर बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत या चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. सोनवणे म्हणाले, “आमच्या पक्षातील कोणताही खासदार अस्वस्थ नाही. आम्ही आठही खासदार एकसंघ आणि खंबीर आहोत. आम्ही सर्व जण संसदेत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात आणि आदरणीय शरद पवार साहेबांच्या आदेशाने व सहकार्याने काम करत आहोत. आम्हाला कुणाचीही ऑफर येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आम्ही सर्वजण ऑफरच्या पलीकडे आहोत. आम्ही आठच्या आठ जण एकत्र आहोत.” शशिकांत शिंदेंचा खुलासा- “एनडीएमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही” शरद पवार यांचा पक्ष एनडीएमध्ये (NDA) सामील होणार असल्याच्या सोशल मीडियावरील चर्चांना पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही पूर्णपणे फेटाळून लावले आहे. शिंदे म्हणाले, “राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) एनडीएमध्ये सामील होणार असल्याच्या सर्व चर्चा निरर्थक आहेत. कालच पक्षाचे सर्व आमदार आणि खासदारांनी शरद पवार साहेबांची भेट घेतली असून, सर्वजण पक्षाशी पूर्णपणे एकनिष्ठ आहेत. एनडीएमध्ये जाण्याबाबत पक्षात कोणतीही चर्चा सुरू नाही आणि तसा विषयही उद्भवू शकत नाही. आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांमध्ये अधिक चांगला समन्वय राखण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू.” शरद पवार गटाकडे लोकसभेतील 8 खासदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यामुळे महाविकास आघाडीत संशयाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या शिवसेनेतील ताजी फूट आणि आणि आता राष्ट्रवादीचे खासदार अस्वस्थ असल्याच्या या चर्चा महाविकास आघाडीसाठी धोक्याची घंटा ठरू शकतात. शरद पवार आणि त्यांचे खासदार हा डॅमेज कंट्रोल कसा करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Source link
शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर