![]()
हिंगोली यंदाच्या खरीप हंगामासाठी हिंगोली जिल्ह्यात प्रधानमंत्री पिकविमा योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेत सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद या पाच पिकांचा समावेश आहे. इच्छुक शेतकऱ्यांना 31 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी दिली आहे. जिल्ह्यात या वर्षी पिकविमा योजनेच्या अंमलबजावणीसाठी एचडीएफसी इर्गो इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांची निवड करण्यात आली आहे. सुधारित पिकविमा योजनेनुसार अधिसूचित महसूल मंडळामध्ये चालू वर्षातील सरासरी उत्पादन उंबरा उत्पादनापेक्षा कमी आल्यास शेतकऱ्यांना पिकविमा भरपाई देण्यात येईल. सर्व पिकांसाठी जोखीम स्तर 70 टक्के निश्चित करण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या विमा संरक्षित रक्कम आणि शेतकरी हिस्सा विमा हप्ता पुढीलप्रमाणे आहे. कापसासाठी हेक्टरी विमा संरक्षित रक्कम 65000 रुपये असून शेतकरी हप्ता 650 रुपये आहे. सोयाबीनसाठी 62500 रुपयांच्या विम्यासाठी 1250 रुपये भरावे लागतील. तूर पिकासाठी 47000 रुपयांच्या विम्यासाठी 1175 रुपये, मुगासाठी 30000 रुपयांसाठी 600 रुपये तर उडीद पिकासाठी 27000 रुपयांच्या विम्यासाठी 540 रुपये हप्ता भरावा लागेल. विमा अर्जासाठी 7/12 उतारा, नमुना 8-अ, पिकपेरा घोषणा पत्र, आधार क्रमांक तसेच आधाराशी संलग्न बँक खाते आवश्यक आहे. डिजिटल क्रॉप सर्व्हेअंतर्गत पिकांची नोंद करणेही अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्यक्ष पेरणी केलेले पीक आणि विमा अर्जात नमूद केलेले पीक यामध्ये तफावत आढळल्यास डिजिटल क्रॉप सर्व्हेमधील नोंद अंतिम ग्राह्य धरली जाईल आणि तफावत असलेला विमा अर्ज रद्द करण्यात येईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान 0.10 हेक्टर क्षेत्रावर पीक लागवड असणे आवश्यक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकमार्फत तर बिनकर्जदार शेतकऱ्यांनी राष्ट्रीय पिकविमा पोर्टलवर स्वतः ऑनलाईन अर्ज करावा. तसेच बँक किंवा सामुद्रिक सेवा केंद्र सीएससी मार्फतही अर्ज सादर करता येतील. सीएससी चालकांना विमा कंपनीकडून प्रति अर्ज 60 रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा हप्त्याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त शुल्क देऊ नये. योजनेत सहभागी होण्याची इच्छा नसलेल्या शेतकऱ्यांनी विहित मुदतीत संबंधित बँकेस लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, किंवा टोल फ्री क्रमांक 14447 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.
Source link
हिंगोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पिकविमा योजना जाहीर:31 जुलैपर्यंत विमा भरता येणार