Headlines

अधिवेशनाचा शेवटचा दिवस तरीही निर्णय नाही:शिक्षकांच्या आंदोलनावरून रोहित पवार आक्रमक, म्हणाले- सरकारने अंत बघू नये, अन्यथा परवडणार नाही




गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आपल्या प्रलंबित आणि न्याय्य मागण्यांसाठी भर पावसात आंदोलन करत असलेल्या शिक्षकांच्या प्रश्नावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारला गंभीर इशारा दिला आहे. २२ जूनपासून सुरू असलेल्या या आंदोलनावर पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत कोणताही तोडगा न निघाल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “देशाचे भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांवर असा अन्याय होणे महाराष्ट्राला शोभणारे नाही. सरकारने या शिक्षकांचा आणखी अंत बघू नये, अन्यथा ते सरकारला परवडणार नाही,” असा सज्जड दम भरत रोहित पवार यांनी आजच्या आज निर्णय घेण्याची मागणी केली आहे. २२ जूनपासून आझाद मैदानावर शिक्षकांचा ठिय्या राज्यातील हजारो शिक्षक आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी २२ जूनपासून मुंबईतील आझाद मैदानावर ठिय्या मांडून बसले आहेत. ऐन पावसाळ्यात आणि विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना शिक्षकांनी हे आंदोलन पुकारले होते. अधिवेशनात यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा शिक्षकांना होती. मात्र, अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस उजाडूनही राज्य सरकारने शिक्षकांच्या प्रश्नावर कोणतीही ठोस घोषणा न केल्याने विरोधकांसह शिक्षक वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. “शिक्षकांवरील अन्याय महाराष्ट्राला शोभणारा नाही” या दिरंगाईवरून आमदार रोहित पवार यांनी सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले, “२२ जूनपासून शिक्षक आपल्या न्याय्य आणि रास्त मागण्यांसाठी आझाद मैदानावर ऊन-पावसाची तमा न बाळगता आंदोलन करत आहेत. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आला, तरी देखील सरकार निर्णय घेत नाहीये. जे शिक्षक उद्याच्या देशाचे आणि राज्याचे भवितव्य घडवतात, त्यांच्यावर असा अन्याय करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला अजिबात शोभणारे नाही.” “आजच्या आज निर्णय घ्या, अन्यथा…” शिक्षकांच्या सहनशीलतेचा अंत न पाहण्याची विनंती आणि थेट इशारा रोहित पवार यांनी सरकारला दिला आहे. “पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे, त्यामुळे माझी राज्य शासनाला नम्र विनंती आहे की, आजच्या आज निर्णय घेऊन रस्त्यावर उतरलेल्या या शिक्षकांना न्याय द्यावा. सरकारने यापुढे शिक्षकांचा अंत बघू नये, अन्यथा याचे परिणाम सरकारला परवडणारे नसतील,” असे खडे बोल रोहित पवार यांनी सुनावले आहेत. रोहित पवार यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता तरी अधिवेशनाच्या या शेवटच्या दिवशी राज्य सरकार शिक्षकांच्या मागण्यांबाबत काही मोठा आणि सकारात्मक निर्णय घेणार का, याकडे संपूर्ण राज्याचे आणि आंदोलक शिक्षकांचे लक्ष लागून आहे. हेही वाचा.. पावसाळी अधिवेशन:भेसळखोरांवर सरकारचा मोठा इशारा, मृत्युदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असल्याची विधानसभेत माहिती गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोपांनी गाजत असलेल्या राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. विरोधकांनी आतापर्यंत उपस्थित केलेले विविध प्रश्न, आरोप आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडींवर आज राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सभागृहात सविस्तर उत्तर देणार आहेत. आज अधिवेशनाची सांगता होत असल्याने सरकार नेमक्या कोणत्या मोठ्या घोषणा करणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अधिवेशनाचे लाइव्ह अपडेट्स वाचा..



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *