![]()
राज्य सरकारचे काम नफा-तोटा पाहणे नसून जनतेला सवलती देणे आणि रोजगार निर्माण करणे हे आहे. सरकार धंदा करायला बसलेली नाही, अशा शब्दांत समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी पॉवरलूम उद्योग, वीजदर, समान नागरी संहिता (UCC), कथित भ्रष्टाचार, पक्षांतर आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसह विविध मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले. अबू आझमी म्हणाले की, कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा उद्योग म्हणजे पॉवरलूम आहे. मात्र, सरकार या उद्योगाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. मुलायमसिंह यादव यांच्या सरकारच्या काळात पॉवरलूमसाठी केवळ 60 रुपयांचे वीजबिल ठेवण्यात आले होते, जेणेकरून उद्योगाला चालना मिळेल. सरकारने नफा-तोटा पाहण्यापेक्षा जनतेला रोजगार आणि सवलती कशा मिळतील यावर भर द्यायला हवा, असे त्यांनी सांगितले. त्यांनी वीज वितरण कंपन्यांवरही निशाणा साधला. काही खासगी कंपन्या ग्राहकांकडून जास्तीत जास्त पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत, ज्या भागात टोरेंटसारख्या कंपन्या आहेत, तेथे टाटा, महावितरण आणि इतर कंपन्यांनाही सेवा देण्याची संधी द्यावी, म्हणजे ग्राहकांना निवडीचा अधिकार मिळेल, अशी मागणी त्यांनी केली. UCC समितीत अल्पसंख्याक प्रतिनिधी नाहीत समान नागरी संहितेसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीत अल्पसंख्याक समाजातील एकाही सदस्याचा समावेश नसल्याबद्दलही त्यांनी आक्षेप घेतला. देशात एकता वाढवणारे निर्णय घ्यावेत, समाजात ध्रुवीकरण निर्माण करणारे नाहीत, असे सांगताना त्यांनी विनोदी शैलीत, रस्त्यावर कोणत्याही समाजाची वरात काढण्यास बंदी घालण्याचा विचार UCC मध्ये करावा, अशी सूचनाही केली. बनावट जात प्रमाणपत्रांवर कारवाईची मागणी बनावट ओबीसी जात प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावर बोलताना अबू आझमी यांनी अनेक प्रकरणांमध्ये बनावट प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याचा आरोप केला. अशा प्रकरणांचा तीन महिन्यांत निकाल लागला पाहिजे. बनावट प्रमाणपत्र तयार करणाऱ्यांवर आणि त्याची पडताळणी करण्यासाठी लाच घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. महाराष्ट्रात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढल्याचा आरोपही त्यांनी केला. पक्षांतर रोखण्यासाठी कायदा बदला राज्यात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराच्या मुद्द्यावरही अबू आझमी यांनी भूमिका मांडली. मतदारांनी एखाद्या विचारसरणीला मतदान केलेले असते. त्यामुळे निवडून आलेल्या प्रतिनिधींनी पक्ष बदलायचा असेल तर प्रथम आमदारकी किंवा खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि पुन्हा निवडणूक लढवावी, असा कायदा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. लोकप्रतिनिधींकडून मारहाणीच्या घटनांचा निषेध डॉक्टरांना मारहाण तसेच रायगडमधील पालिका अध्यक्षांना झालेल्या मारहाणीच्या घटनांवर बोलताना त्यांनी सत्तेच्या अहंकारामुळे अशा घटना घडत असल्याचे म्हटले. अधिकारी चूक करत असतील तर त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार करावी, मात्र मारहाण करणे कोणत्याही परिस्थितीत योग्य नाही. अशा प्रकारच्या घटनांतील दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. विरोधकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांबाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अबू आझमी म्हणाले की, लोकशाहीत विरोधकांना सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. सत्तेत आल्यानंतर अहंकारातून कोणतीही भाषा वापरणे योग्य नाही. महाराष्ट्रात प्रभावी विरोधक नसल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, सत्ताधाऱ्यांनी टीका सहन करण्याची तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले. निदा खान प्रकरणात न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत निदा खान प्रकरणावर बोलताना अबू आझमी यांनी संबंधित प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या जामिनाच्या निर्णयाचे स्वागत केले. या प्रकरणात निदा खान निर्दोष असल्याचा दावा त्यांनी केला. न्यायालयाने मानवीय दृष्टिकोनातून दिलेल्या निरीक्षणांचे त्यांनी स्वागत करत, अखेरीस न्यायालयीन प्रक्रियेत सत्य समोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हेही वाचा… मुख्यमंत्र्यांवर टीका म्हणजे महाराष्ट्राचा अपमान नव्हे:रोहित पवारांचा फडणवीसांना टोला, कर्जमाफीपासून ‘ऑपरेशन टायगर’पर्यंत अनेक मुद्द्यांवर सरकारला घेरलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली म्हणजे महाराष्ट्राचा अपमान होत नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. सरकारच्या कामकाजावर टीका करणे हा लोकशाहीतील विरोधकांचा अधिकार असून, त्याचा महाराष्ट्राच्या अस्मितेशी संबंध जोडणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी कर्जमाफी, निकृष्ट दर्जाची विकासकामे, अजित पवारांच्या अपघाताची चौकशी, पिंपरी-चिंचवड दुर्घटना तसेच ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेसह अनेक मुद्द्यांवर सरकारला लक्ष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शालेय साहित्य खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा?:संजय राऊतांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या शालेय साहित्य आणि गणवेश खरेदीत तब्बल ४०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उबाठा) खासदार संजय राऊत यांनी केला आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी ९ जुलै २०२६ रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवले असून, या भ्रष्टाचाराचे सर्व पुरावेही जोडले आहेत. “न खाऊंगा, न खाने दूंगा, हे पंतप्रधानांचे वाक्य प्रेरणादायी आहे, पण या व्यवहारात तुमच्याच मंत्रिमंडळातील एका वरिष्ठ मंत्र्याने पालिकेवर दबाव आणून ५० ते ५५ कोटी रुपयांची टक्केवारी खाल्ली आहे,” असा खळबळजनक गौप्यस्फोट राऊत यांनी या पत्रात केला आहे. या प्रकरणावर कारवाई झाली तरच नवल वाटेल, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी शरद पवारांचे 5-6 खासदार अस्वस्थ:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्याने खळबळ! खासदार बजरंग सोनवणे आणि शशिकांत शिंदेंनी दिलं थेट उत्तर राज्याच्या राजकारणात सध्या फोडाफोडीच्या आणि नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे. यातच आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे 5 ते 6 खासदार सध्या अस्वस्थ आहेत आणि ते काय करतील हे सांगता येत नाही,” असे विधान चव्हाण यांनी केले आहे. या दाव्यामुळे महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी हा दावा फेटाळून लावत पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे स्पष्ट केले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या पक्षाने महाराष्ट्रात सर्वाधिक 8 जागा जिंकल्या आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय समीकरणांमध्ये वेगाने बदल होताना दिसत आहेत, ज्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. सविस्तर वाचा..
Source link
अबू आझमींचा सरकारवर हल्लाबोल:'सरकार धंदा करायला बसलेली नाही; जनतेला सवलत देणं हेच सरकारचं काम'