Headlines

शहर स्वच्छतेसाठी आयुक्त अमोल येडगे स्वतः मैदानात:दोन दिवसांत 1 लाखांचा दंड वसूल, 'संभाजीनगर पॅटर्न'ची चर्चा




छत्रपती संभाजीनगर शहरात स्वच्छतेसाठी मनपा आयुक्त अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून ‘विशेष संयुक्त पाहणी पथके’ स्थापन करण्यात आली आहेत. आयुक्त स्वतः रात्रीच्या वेळी रस्त्यावर उतरून या मोहिमेची पाहणी करत आहेत. हा अभिनव ‘छत्रपती संभाजीनगर पॅटर्न’ यशस्वी झाल्यास तो देशासाठी कचरा व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण ठरू शकतो, असा विश्वास व्यक्त होत आहे. शहराच्या विविध भागांवर लक्ष ठेवण्यासाठी २९ विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. प्रत्येक पथकात स्वच्छता निरीक्षक, नागरिक मित्र पथकाचे कर्मचारी, आय.ई.सी. सुपरवायझर आणि वेईकल सुपरवायझर यांचा समावेश आहे. ही पथके दर सोमवार आणि गुरुवारी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत शहरातील मुख्य बाजारपेठा, हॉटेल्स, दुकाने आणि पानटपऱ्यांची अचानक पाहणी करतात. या मोहिमेदरम्यान दुकानांसमोरील परिसर स्वच्छ आहे का, ओला-सुका कचरा वेगवेगळ्या डस्टबीनमध्ये ठेवून तो घंटागाडीतच टाकला जातोय का, तसेच प्रतिबंधित सिंगल-युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद आहे का, या बाबींवर पथकांचे बारीक लक्ष असते. आयुक्त अमोल येडगे स्वतः रात्री शहरात फिरून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांना त्यांनी जागेवरच दंड ठोठावला आहे. तसेच, कामात हलगर्जीपणा दाखवणाऱ्या महापालिका कर्मचाऱ्यांवरही आयुक्तांनी तात्काळ कारवाई केली आहे. या संपूर्ण मोहिमेचे नियंत्रण उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन नंदकिशोर भोंबे यांच्याकडे आहे. सोमवार आणि गुरुवार अशा अवघ्या दोन दिवसांत प्रशासनाने तब्बल १ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, टीव्ही सेंटर, सेंट्रल नाका, चिश्तिया चौक या प्रमुख बाजारपेठांसह १३ व्यावसायिक प्रभागांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली. एकाच दिवशी १३ प्रभागांमधून ३८ हजार रुपये वसूल करण्यात आले, ज्यात प्रभाग ५ आणि प्रभाग १५ मध्ये सर्वाधिक प्रत्येकी ६,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या मोहिमेविषयी बोलताना मनपा आयुक्त अमोल येडगे म्हणाले, “छत्रपती संभाजीनगर शहराला स्वच्छतेत देशात अग्रस्थानी नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. केवळ कायदे करून किंवा कर्मचाऱ्यांवर विसंबून न राहता, व्यावसायिक आणि नागरिकांचा सहभाग यात महत्त्वाचा आहे. पहिल्या टप्प्यात आम्ही जनजागृती आणि सूचनांवर भर देऊ, पण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक दंडात्मक कारवाई देखील केली जाईल.” स्थानिक व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, “महापालिका आयुक्तांची ही संकल्पना अत्यंत कौतुकास्पद आहे. शहर स्वच्छ राहिल्यास त्याचा फायदा व्यापाऱ्यांनाच होतो. कचरा वर्गीकरण करणे ही आपलीही जबाबदारी आहे आणि मनपाच्या या मोहिमेला शहरातील सर्व व्यापारी पूर्ण सहकार्य करतील.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *