![]()
प्रा. डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांची महाराष्ट्र शासनाने अमरावती विभागीय वातावरणीय कृती कक्षात निमंत्रीत सदस्य म्हणून निवड केली आहे. हवामान बदलाच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. डॉ. वऱ्हेकर हे वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्थेचे (वेक्स) उपाध्यक्ष देखील आहेत. श्रीमती नरसम्मा कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या पर्यावरण शास्त्र विभागात प्राध्यापक असलेले डॉ. वऱ्हेकर अनेक वर्षांपासून पर्यावरण संरक्षण, जैवविविधता संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि जनजागृती क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन शासनाने त्यांची निवड केली आहे. वाढते तापमान, उष्णतेच्या लाटा, दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, गारपीट, वीज पडणे, समुद्र पातळीत वाढ आणि चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. याचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर आणि अर्थव्यवस्थेवर होत आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने शहर, जिल्हा आणि विभागीय स्तरावर स्वतंत्र वातावरणीय कृती कक्ष उभारले आहेत. विभागीय वातावरणीय कृती कक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण कृती आराखडे तयार करणे, त्यांची अंमलबजावणी करणे, पर्यावरणीय उपक्रमांना चालना देणे तसेच विविध शासकीय आणि अशासकीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी पार पाडली जाईल. डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांनी या कार्यात सक्रिय पर्यावरण संरक्षक कार्यावर अधिक भर देणार असल्याचे सांगितले. या निवडीबद्दल नरसम्मा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.एस. चंदनपाट, वेक्स संस्थेच्या डॉ. अंजली देशमुख, डॉ. गजानन वाघ, डॉ. जयंत वडतकर, मंजुषा वाठ आणि किरण मोरे आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र राज्यात एकूण ४३ ठिकाणी असे कक्ष सुरु होणार आहेत. या निर्णयामुळे राज्यातील ‘माझी वसुंधरा अभियान’, ‘हरित महाराष्ट्र कार्यक्रम’, राज्य हवामान कृती आराखडा तसेच भारताच्या २०७० पर्यंत ‘नेट-झिरो’ कार्बन उत्सर्जनाच्या उद्दिष्टाला बळ मिळणार आहे. राज्यातील ४३ अमृत शहरांमध्ये ‘सिटी क्लायमेट ॲक्शन सेल’ स्थापन केले जाणार असून, प्रत्येक शहरासाठी स्वतंत्र हवामान कृती आराखडा तयार केला जाईल. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ‘डिस्ट्रिक्ट क्लायमेट ॲक्शन सेल’ कार्यरत राहणार आहे. हे कक्ष कृषी, जलसंपदा, आरोग्य, उद्योग, परिवहन, वन, ग्रामविकास आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांचा समन्वय साधून हवामान बदलाशी संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करतील.
Source link
डॉ. श्रीकांत वऱ्हेकर यांची अमरावती विभागीय कृती कक्षात निवड:पर्यावरण संरक्षणातील योगदानामुळे महाराष्ट्र शासनाने केली नियुक्ती.