![]()
शहरात महावितरण व संबंधित ठेकेदारांकडून ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. कोणतीही पूर्वसूचना, लेखी परवानगी किंवा ग्राहकांची संमती न घेता जुने डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले जात असल्
.
सटाणा शहरातील अभिमन्यूनगर परिसरात वायरमन, ठेकेदारांचे कर्मचारी व महावितरणचे अधिकारी ग्राहकांना आवश्यक माहिती न देता थेट मीटर बदलत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला. जुने डिजिटल मीटर व्यवस्थित सुरू असतानाही ते बदलण्यात येत असल्याने नागरिक संतप्त झाले. दरम्यान, नवीन वसाहतीतील नागरिकांनी स्मार्ट मीटर बसविण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. आधी बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून जुने मीटर पुन्हा बसवावेत, अन्यथा संबंधित कर्मचारी व वायरमन यांना परिसरातून जाऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेतली. त्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच महावितरणचे सहाय्यक अभियंता घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित परिसरात स्मार्ट मीटर बसविण्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित केली.
यावेळी नागरिकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत ग्राहकांची पूर्वसंमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवू नयेत, ग्राहकांच्या अधिकारांचा सन्मान करावा व कोणतीही सक्तीची कारवाई करू नये, अशी मागणी केली. तसेच स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये असलेल्या शंका व संभ्रम दूर करण्यासाठी महावितरणने जनजागृती करून आपली स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही करण्यात आली.
या घटनेमुळे सटाणा शहरात स्मार्ट मीटरच्या अंमलबजावणीवरून नागरिक आणि महावितरण यांच्यात वाद निर्माण झाला असून, पुढील काळात महावितरण प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सटाणा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.