![]()
परिसरात यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरणीची कामे उरकून घेतली. मात्र, पेरण्या आटोपल्यानंतर पावसाने अचानक दडी मारल्याने बळीराजाची चिंता कमालीची वाढली असून, आता संपूर्ण परिसराला दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. पेरणी झालेल्या शेतांमध्ये पिकांची उगवण सुरू झाली असली, तरी पुरेशा ओलाव्याअभावी अनेक ठिकाणी कोवळी रोपे कोमेजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. यंदा पिंपळदरी परिसरात सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद आदी खरीप पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर पूर्ण झाली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या हलक्या पावसामुळे जमिनीत काही प्रमाणात ओलावा निर्माण झाला होता. याच ओलाव्याचा फायदा घेत शेतकऱ्यांनी मशागतीची कामे घाईघाईने उरकून पेरणी केली. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवली आहे. कडक ऊन आणि कोरड्या हवामानामुळे जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून पिकांच्या पुढील वाढीवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. शेतकरी दररोज हवामानाचा अंदाज घेत असून आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. वेळेत दमदार पाऊस न झाल्यास पिके जळून खाक होतील आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे मोठे संकट ओढवेल. दुबार पेरणीसाठी लागणारा बियाणे व खतांचा अतिरिक्त खर्च पेलणे गरीब शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने त्यांची आर्थिक चिंता वाढली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाला आहे. यामुळे शेतजमिनीला उन्हाळ्यात पडलेल्या भेगा अद्यापही पूर्णपणे बुजलेल्या नाहीत. पिकांच्या मुळांना आवश्यक असलेला ओलावा न मिळाल्याने त्यांची वाढ खुंटली आहे. पाऊस झाल्यास पिकांना नवसंजीवनी मिळणार कृषी क्षेत्रातील जाणकारांच्या मते, पेरणीनंतर सलग आणि समाधानकारक पाऊस होणे अत्यंत आवश्यक असते, जेणेकरून जमिनीत पुरेसा ओलावा टिकून राहतो आणि पिकांची निरोगी वाढ होते. सध्या मात्र शेतकऱ्यांची सर्व भिस्त केवळ निसर्गावरच अवलंबून आहे. येत्या चार ते पाच दिवसांत जर समाधानकारक पाऊस झाला, तरच या कोमेजणाऱ्या पिकांना नवसंजीवनी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
Source link
पिंपळदरी परिसरात पावसाअभावी पिके संकटात:रिमझिम पावसावर पेरण्या आटोपल्या, आता शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे