![]()
आम आदमी पक्षाच्या वतीने राज्यभर इथेनॉलमिश्रित पेट्रोल सक्तीने विक्रीविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. या अभियानांतर्गत मंगळवारी शहरात ‘आप’चे शहराध्यक्ष हाजी मसूद अहमद खान यांच्या नेतृत्वात विविध पेट्रोल पंपांवर स्वाक्षरी अभियान राबवून निषेध नोंदवण्यात आला. या आंदोलनाचा प्रारंभ शहरातील गांधी मार्ग येथील पेट्रोल पंपापासून करण्यात आला. यावेळी ‘आप’चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हातात इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाचा निषेध करणारे फलक घेत घोषणाबाजी केली. यानंतर कार्यकर्त्यांनी वजीफदार पेट्रोल पंप, कारमेल चौक पेट्रोल पंप आणि इतर प्रमुख इंधन केंद्रांवर जाऊन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या शेकडो ग्राहकांच्या स्वाक्षरी घेतल्या. सरकारने या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता आणावी आणि पेट्रोलमधील इथेनॉलच्या प्रमाणानुसार किमतीत कपात करून कर कमी करावेत, अशी मागणी केली. या आंदोलनात आपचे अरविंद कांबळे, गजानन बुळूकले, अशोक शेंगोकार, अरमान खान पठाण, आकीब खान, श्रावण रंगारी, माणिक मोरे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. वाहनांचे मायलेज घटले पेट्रोलमध्ये इथेनॉलचे प्रमाण वाढवले जात असले, तरी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी होऊनही देशात इंधनाचे दर कमी झाले नाहीत. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे मायलेज लक्षणीयरीत्या घटले आहेत. तसेच जुन्या वाहनांचे इंजिन या इंधनासाठी अनुकूल नसल्याने इंजिनचे नुकसान होत आहे, अशा तक्रारी वाढल्या आहेत. मेकॅनिक सुद्धा असेच सांगत आहेत.
Source link
इथेनॉलमिश्रित पेट्रोलविरोधात ‘आप'चे पेट्रोल पंपांवर आंदोलन