![]()
पावसाने ७ जुलैपासून अचानक उघडीप दिल्याने महान व परिसरातील कपाशी उत्पादक शेतकऱ्यांनी मजूर वर्गाच्या मदतीने कपाशी निंदणाची कामे वेगाने पूर्ण केली आहेत. मात्र, दुसरीकडे गत आठवडाभरापासून एकही पावसाची सर न कोसळल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी चांगलेच अडचणीत सापडले आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीला (१ ते ७ जुलै दरम्यान) पावसाने सतत हजेरी लावल्याने कपाशी पिकाची कोळपणी (डूबा), निंदण आणि रासायनिक खतांचे डोस देण्याच्या कामात शेतकऱ्यांना अडथळा येत होता. परंतू, ७ जुलैच्या संध्याकाळपासून १४ जुलैपर्यंत पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्यामुळे परिसरातील शेती कामांना वेग आला आहे. रखडलेली कामे आटोक्यात आली आहेत. शेतीकामे आटोपली असली तरी, सध्या सर्वच पिकांना पावसाची गरज भासत आहे. सध्या सर्वच पिकांना संजीवनी देण्यासाठी पावसाची नितांत आवश्यकता आहे. शेतकरी पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. सोयाबीनची पीक कोमेजले पावसाने आठ दिवसांपासून तोंड फिरवल्याने कपाशीसह सोयाबीन, तूर, ज्वारी, उडीद आणि मूग ही खरिपाची पिके पाण्यासाठी व्याकुळ झाली आहेत. जुलैच्या सुरुवातीला पेरणी झालेल्या सोयाबीन पिकाला सध्या पाण्याची नितांत गरज आहे. दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत असल्याने आणि जमिनीत ओलावा नसल्याने सोयाबीनची पीक पाण्याअभावी मान टाकत आहे. त्यामुळे खरिपाचे हे मुख्य पीक धोक्यात आले आहे.
Source link
पावसाच्या उघडीपीने कपाशी, सोयाबीन उत्पादक अडचणीत:दुबार पेरणीनंतर महानच्या शेतकऱ्यांची चिंता वाढली