Headlines

‘प्रहार’चा पाठपुरावा; शेतकऱ्यांना सिंचन योजनेतून मिळणार पाणी:तालुक्यात कोरडवाहू भागातील 12 गावच्या शेतकऱ्यांचा समावेश




तालुक्यातील गुरुकुंज उपसा जलसिंचन योजना (भाग-१) मधून पूर्णपणे वगळण्यात आलेल्या कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला असून, स्वतंत्र उपसा जलसिंचन योजनेस शासनाची मंजुरी मिळाली आहे. या योजनेमुळे वऱ्हा मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रूक, शिवणगावसह १२ गावांतील शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय देशमुख यांनी या मागणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या कार्यकाळात वऱ्हा येथील मुरली मदणकर व रवी पाथरे यांच्यासह त्यांनी उपोषण करुन या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर तत्कालीन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी संबंधित कार्यकारी अभियंत्यांना कोरडवाहू गावांसाठी स्वतंत्र योजना तयार करण्याचे निर्देश दिले. दरम्यान, या गावांचा समावेश नदीजोड प्रकल्पात करण्याचा विचार विभागाकडून करण्यात आला होता. मात्र नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास होणारा विलंब लक्षात घेता, संजय देशमुख यांनी या गावांसाठी स्वतंत्र उपसा जलसिंचन योजना मंजूर करण्याची मागणी लावून धरली. यासाठी त्यांनी शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार केला. तसेच तिवसा मतदारसंघाचे आमदार राजेश वानखडे यांची भेट घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे योजनेच्या मंजुरीसाठी प्रयत्न करण्याची विनंती केली. विधानपरिषदेच्या सदस्यांनाही यासंदर्भात पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले. आमदार राजेश वानखडे आणि आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेतही ही मागणी मांडली. या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर योजनेला मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात आले. या योजनेमुळे कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून अनेक शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. “आमच्या हयातीत शेतीला पाणी मिळाले नाही तरी आमच्या मुलांचे भविष्य तरी उज्ज्वल होईल,” अशा भावना काही ज्येष्ठ शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. योजनेला मंजुरी मिळाल्याबद्दल शेतकऱ्यांनी सिंचन विभागाचे अभियंता राजभोज यांचे आभार मानले. यावेळी भीमराव गवळी, सुरेंद्र धस्कट, नारायणराव उमक, दत्ता धस्कट, प्रवीण घोम, जितेंद्र गोस्वामी, दीपक उतखेडे, नरेंद्र काकडे, गजानन काकडे, योगेश लोखंडे, मुरली मदणकर, रवी पाथरे, ज्ञानेश्वर ढगालकर तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य संजय देशमुख उपस्थित होते. गुरुकुंज उपसा जलसिंचन योजनेतून वगळण्यात आलेल्या गावांतील शेतकरी अनेक वर्षांपासून सिंचनाच्या पाण्यापासून वंचित होते. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे उत्पादनात मोठी अनिश्चितता होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी, ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी विविध आंदोलनांद्वारे शासनाचे लक्ष वेधले. एवढेच नव्हे तर सातत्यपूर्ण पाठपुरावाही केला. कोणत्या गावांना मिळणार लाभ ? या योजनेमुळे तिवसा तालुक्यातील वऱ्हा, मालधुर, धोत्रा, माळेगाव, सालोरा, शेंदोळा बुद्रूक, शिवणगाव यांच्यासह एकूण १२ गावांतील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सिंचन सुविधा उपलब्ध झाल्यानंतर कोरडवाहू शेतीचे क्षेत्र कमी होऊन उत्पादनवाढीसही मदत होणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *