Headlines

यंदा 100 स्टार्टअप्सना 25 हजारांचे ‘सीड फंडिंग’:विद्यापीठ-अमृत संस्थेचा सामंजस्य करार; नवउद्योजकांना मिळणार आता नवे बळ‎




संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे रिसर्च अँन्ड इन्क्युबेशन फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाची ‘अमृत’ संस्था (पुणे) यांच्यात नुकताच सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या कराराअंतर्गत विद्यापीठातील १०० नवसंशोधकांची टप्प्याटप्प्याने निवड करण्यात येणार असून, प्रारंभी २५ स्टार्टअप्सना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एका वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांची फेलोशिप अथवा सीड फंडिंग मिळणार आहे. तरुण उद्योजकांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांना चालना देणे, संशोधनाला उद्योगाचे रुप देणे आणि नवसंशोधकांना आर्थिक व तांत्रिक पाठबळ उपलब्ध करुन देणे, हा या कराराचा मुख्य उद्देश आहे. कुलगुरु डॉ. मिलिंद बारहाते यांच्या मार्गदर्शनाखाली हा करार करण्यात आला. दरम्यानच्या काळात स्थानिक विद्यार्थ्यांच्या इतर विषयांतील काही स्टार्टअपला सीड फंडही प्राप्त झाला आहे. याशिवाय विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमार्फत अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, कार्यालयीन सुविधा, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच व्यवसाय विकासासाठी आवश्यक सहाय्यसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे. कृषी तंत्रज्ञान, बायोटेक्नॉलॉजी, इलेक्ट्रिक वाहन (ईव्ही) आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) यांसारख्या आधुनिक क्षेत्रांतील स्टार्टअप्सना या उपक्रमातून विशेष लाभ मिळणार आहे. पुढील तीन वर्षे हा उपक्रम राबविण्यात येणार असून, संशोधनाधारित उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा करार महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील नाविन्यपूर्ण संशोधनाला उद्योगाचे रूप मिळण्यास मदत होणार असून रोजगारनिर्मितीलाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे. सामंजस्य करारावेळी कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, इन्क्युबेशन सेंटरच्या प्रमुख प्रा. स्वाती शेरेकर, सीईओ आनंद यादव, अमोल हिरुळकर, अमृत संस्थेचे विभागीय व्यवस्थापक प्रवीण कोळेश्वर, जिल्हा व्यवस्थापक ऋषिकेश हरिश कथलकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. उद्योजकांसाठी सुवर्णसंधी या उपक्रमांतर्गत तीन वर्षात १०० स्टार्टअपची निवड केली जाणार असली तरी सुरुवातीला २५ स्टार्टअप्सलाच लाभ होणार आहे. निवड झालेल्या प्रत्येक स्टार्टअपला ‘अमृत’ संस्थेकडून एक वर्षासाठी दरमहा २५ हजार रुपयांचे सीड फंडिंग मिळेल. तसेच विद्यापीठाच्या इन्क्युबेशन सेंटरमार्फत अत्याधुनिक प्रयोगशाळा, कार्यशाळा, कार्यालयीन सुविधा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. कृषी तंत्रज्ञान, बायोटेक, ईव्ही आणि आयओटी क्षेत्रातील नवकल्पनांना या योजनेत प्राधान्य देण्यात येणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *