![]()
पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश बी. डी. कुलकर्णी यांनी महादेव विलास बालगुडे यांना नियमित जामीन मंजूर केला आहे. बालगुडे यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप होता. पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. बालगुडे यांच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 152 सह विविध कलमांखाली गुन्हा दाखल त्यावेळी करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले की, नागरिकांना सरकारच्या कामकाजावर टिप्पणी करण्याचा, प्रशंसा करण्याचा तसेच टीका करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. सरकारवर टीका करणे हा देशद्रोह नाही. न्यायालयाने आरोपीने केलेल्या विविध सोशल मीडिया पोस्टचे स्वतंत्रपणे परीक्षण केले. देशाची अखंडता धोक्यात आणण्याचा हेतू नाही यामध्ये भारताची सार्वभौमता, एकता किंवा अखंडता धोक्यात आणण्याचा अथवा राज्याविरुद्ध युद्ध पुकारण्याचा हेतू प्रथमदर्शनी दिसून येत नाही, असे न्यायालयाने नमूद केले. त्यामुळे बीएनएस कलम 152 लागू होते की नाही, हा मुद्दा न्यायालयीन विचाराचा विषय असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. आरोपी महादेव बालगुडे हे 23 एप्रिल 2026 पासून न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्याकडून आणखी कोणतीही वसुली बाकी नसल्याने त्यांना पुढे कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. यामुळे, न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि आवश्यक अटींसह आरोपीची जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले. आरोपीतर्फे ॲड. महेश देशमुख, ॲड. समीर शेख आणि ॲड. नीलेश वाघमोडे यांनी बाजू मांडली.
Source link
सरकारवर टीका करणे म्हणजे देशद्रोह नाही:मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या महादेव बालगुडेंना जामीन; पिंपरी कोर्टाचा मोठा निर्णय