Headlines

FDAची धडक कारवाई:115 वर्षे जुन्या 'पारशी डेअरी'चा परवाना रद्द; दुधात पावडर आणि तेलाची भेसळ, राज्यभरात 45 लाखांचा साठा जप्त




अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात अन्न माफियांवर आणि भेसळखोरांवर धडक कारवाई सुरू आहे. १४ आणि १५ जुलै २०२६ दरम्यान एफडीएने राज्यभरातील विविध दुग्धजन्य पदार्थ आणि अन्नपदार्थांच्या केंद्रांवर छापे टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये मुंबईतील प्रतिष्ठित आणि 115 वर्षे जुन्या ‘पारशी डेअरी फार्म’चा परवाना निलंबित करण्यात आला आहे. तसेच, दुधाचे प्रमाण आणि स्निग्धांश वाढवण्यासाठी ‘डेअरी पर्मिएट पावडर’ आणि सोयाबीन-सूर्यफूल तेलाचा वापर होत असल्याचा धक्कादायक प्रकारही उघडकीस आला आहे. या दोन दिवसांच्या मोहिमेत एफडीएने राज्यभरातून तब्बल ₹45,78,396 किमतीचा भेसळयुक्त आणि संशयास्पद साठा जप्त केला आहे. पाहा एफडीएच्या कारवाईची छायाचित्रे जप्त करण्यात आलेला एकूण साठा: कारवाईतील प्रमुख आणि धक्कादायक खुलासे 1. पारशी डेअरी फार्म, मरीन लाईन्स (मुंबई) 1916 मध्ये स्थापन झालेल्या आणि मुंबईची ओळख असलेल्या मरीन लाईन्स येथील पारशी डेअरी फार्मवर एफडीएने धाड टाकली. या कारवाईत अन्नसुरक्षा व स्वच्छतेचे तीनतेरा वाजल्याचे समोर आले. उत्पादन विभागात प्रचंड अस्वच्छता, भिंतींवर बुरशी, माशांचा मोठा वावर आणि उंदीर-कीटक प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव होता. कच्चा माल थेट जमिनीवर आणि बुरशीग्रस्त भिंतीलगत ठेवण्यात आला होता. सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (ETP) आणि सुरक्षित ‘रॉ मिल्क रिसेप्शन डॉक’ तिथे नव्हता. अनेक उत्पादनांच्या पॅकिंगवर ‘एक्सपायरी डेट’ नव्हती, तसेच कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदीही अपूर्ण होत्या. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ खेळल्याप्रकरणी आस्थापनेचा FSSAI परवाना तत्काळ निलंबित करण्यात आला असून उत्पादन व विक्रीस मनाई करण्यात आली आहे. 2. पारशी डेअरी फार्म, तलासरी (पालघर) पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील पारशी डेअरीच्या केंद्रावरही एफडीएने धडक कारवाई केली. निकृष्ट दर्जा आणि भ्रामक लेबलिंगच्या संशयावरून कुकिंग देसी काऊ बटर, मलई पनीर आणि विनालेबल कोलोस्ट्रम असा तब्बल ₹32,10,741 किमतीचा साठा जप्त करण्यात आला. 3. सांगली: दुधात पावडर आणि तेलाची भेसळ सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील सलगरे येथे दोन गोठ्यांवर कारवाई करत एफडीएने दुधातील भयानक भेसळ उघडकीस आणली. रामचंद्र पाटील यांचा गोठा: दुधाचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवण्यासाठी ‘डेअरी पर्मिएट पावडर’ आणि ‘रिफाइंड सोयाबीन तेलाचा’ वापर करून भेसळयुक्त दूध तयार केले जात होते. हे दूध जागेवरच नष्ट करण्यात आले. बजरंग पाटील यांचा गोठा: दुधातील फॅट (स्निग्धांश) वाढवण्यासाठी ‘रिफाइंड सनफ्लॉवर (सूर्यफूल) तेलाचा’ वापर केला जात होता. हे भेसळयुक्त दूधही नष्ट करण्यात आले. 4. मुंबई उपनगरातील कारवाया गोरेगाव: दुधाच्या पिशव्या फोडून त्यात पाणी मिसळणाऱ्या आणि छेडछाड करणाऱ्या 2 आरोपींना अटक करण्यात आली. 558 लिटर दूध (822 पिशव्या) जप्त करून नष्ट करण्यात आले. मुलुंड (अग्रवाल एंटरप्रायझेस): 61.25 किलो विनालेबल चीज आणि संशयास्पद पनीर जप्त करण्यात आले. हे पनीर प्रत्यक्षात ‘चीज ॲनालॉग’ (कृत्रिम चीज) असण्याची दाट शक्यता आहे. गोवंडी (सूफी डेअरी): सरकारी नियमांचे उल्लंघन करून 1683 लिटर सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध बेकायदेशीरपणे विकले जात होते. हे दूध बंदिस्त गटारात सोडून नष्ट करत व्यवसाय बंदची नोटीस बजावण्यात आली. 5. वसई: शिव डेअरी (पालघर) चिंचोटी येथील ‘शिव डेअरी’मधून 181 किलो (किंमत ₹57,920) विहित दर्जानुसार नसलेले सैल पनीर जप्त करण्यात आले. कोणतीही वैध नोंदणी आणि परवाना नसताना येथे उत्पादन सुरू असल्याने कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तुकाराम मुंढेंचा इशारा एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून अन्न माफियांवर वचक बसला आहे. यापूर्वी के. रुस्तम आईस्क्रीम, शालीमार आणि नूर मोहम्मदी रेस्टॉरंटवरही कारवाई झाली होती. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कोणत्याही आस्थापनेला, ती कितीही जुनी किंवा प्रतिष्ठित असली तरी, पाठीशी घातले जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *