![]()
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआरच्या निषेधार्थ काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आज, बुधवारी अमरावती येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत धरणे आंदोलन केले. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख, अमरावती महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले आणि माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी या निषेध आंदोलनाचे नेतृत्व केले. हल्दवानी येथे काँग्रेसचे अध्यक्ष तथा राज्यसभेतील विरोधी पक्षनेते खासदार मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभास्थळाचे भाजप आणि आरएसएसच्या कार्यकर्त्यांकडून कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आले होते. त्या घटनेचा निषेध करत दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी खासदार राहुल गांधी यांनी आंदोलन केले होते. याच आंदोलनामुळे त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला. काँग्रेसने हा एफआयआर म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला असून ती विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका केली. आंदोलनानंतर अमरावतीचे अपर जिल्हाधिकारी गोविंद दानेज यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनाद्वारे हल्दवानी येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर तातडीने एफआयआर दाखल करावा, तसेच कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, लोकशाही व्यवस्थेत राजकीय मतभेद असू शकतात; मात्र कोणत्याही राजकीय नेत्याच्या सभास्थळी जातीय किंवा भेदभावपूर्ण मानसिकता दाखवणे हे सामाजिक सलोखा, समानता आणि संविधानिक मूल्यांसाठी गंभीर बाब आहे. दरम्यान, राहुल गांधींविरुद्धच एफआयआर दाखल करण्यात आल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप आहे. काँग्रेसने ठाम भूमिका मांडली की, अन्याय, भेदभाव आणि संविधानिक मूल्यांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नसून लोकशाहीतील जबाबदारी आहे. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि प्रत्येक नागरिकाच्या प्रतिष्ठेचे संरक्षण ही भारतीय संविधानाची मूलभूत मूल्ये आहेत. या मूल्यांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही कृत्याचा निषेध करणे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी करणे हा प्रत्येक लोकशाहीवादी नागरिकाचा अधिकार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले. या आंदोलनात प्रामुख्याने प्रदेश महासचिव किशोर बोरकर, प्रदेश सचिव हाजी नजीर खान, माजी महापौर अशोक डोंगरे, संजय वाघ, विनोद मोदी, सलीम मिरावाले, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, डॉक्टर अर्चना आत्राम, राजश्री जठाळे, सुजाता झाडे, वंदना थोरात, मैथिली पाटील, जयश्री मरापे, शिल्पा राऊत, कीर्तिमाला चौधरी, किरण चांदवडकर, कांचन खोडके, अशोक डोंगरे, मुन्ना राठोड, अभिनंदन पेंढारी, विजय वानखडे, अविनाश पांडे, विजय देशमुख, समीर जावंजाळ, संकेत कुलट, वैभव देशमुख यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
Source link
काँग्रेसने राहुल गांधींवरील एफआयआरविरोधात आंदोलन केले:हल्दवानी घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत निवेदन दिले