![]()
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या (डफरीन) एसएनआयसीयूमध्ये २२ ऑगस्ट रोजी व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन तीन नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. मात्र, या समितीचा अहवाल अजूनही शासनाला सादर झालेला नाही. सूत्रांनुसार, अहवालाला अंतिम स्वरूप देण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे तो गुरुवारी सादर होईल की नाही, हे सांगणे कठीण आहे. या घटनेला आठ दिवस उलटूनही नेमके कोण जबाबदार आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे विरोधकांसह सामान्य नागरिकांचे लक्ष या अहवालाकडे लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची त्वरित दखल घेऊन चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा केली होती. आरोग्य सेवा संचालनालयाचे आयुक्त संजय काटकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीत सार्वजनिक आरोग्य, अग्निशमन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि अशासकीय सदस्य असे एकूण अकरा जण आहेत. समितीने २४ ऑगस्ट रोजी घटनास्थळाची पाहणी केली होती. त्यांनी एसएनआयसीयूमध्ये दाखल असलेल्या ३४ बालकांना हलवण्यात आलेल्या वेगवेगळ्या रुग्णालयांनाही भेटी दिल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात डॉक्टर्स, नर्स, वॉर्ड बॉय, सुरक्षारक्षक आणि बचावकार्यात सहभागी झालेल्या सर्वांची साक्ष नोंदवली. डफरीन रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर्स, सार्वजनिक बांधकाम आणि अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. समितीच्या सदस्यांनी जिल्हाधिकारी आशिष येरेकर आणि त्याच दिवशी दौऱ्यावर असलेल्या शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचीही भेट घेतली होती. या सर्व माहितीवर आधारित अहवाल अजून तयार व्हायचा आहे. या घटनेपूर्वी २०२२ मध्येही डफरीन रुग्णालयाच्या त्याच एसएनआयसीयूमध्ये व्हेंटिलेटरचा स्फोट झाला होता. त्या घटनेचा अहवालही अजून जाहीर झालेला नाही. राज्यातील इतर घटनांचे अहवालही सार्वजनिक न झाल्याने, या वेळीही असेच होईल का, असा प्रश्न विचारला जात आहे.
Source link
डफरीन रुग्णालयातील अग्निकांडात दोषी कोण, हा प्रश्न कायम:तीन नवजात बालकांच्या मृत्यूचा चौकशी अहवाल अजूनही शासनाकडे नाही