Headlines

माघाठाण्यात रंगणार 'मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी'चा थरार:मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटणार हंडी




मुंबईतील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आणि मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी बोरीवलीतील माघाठाणे येथे भव्य ‘मातृभाषा शिक्षण जागर दहीहंडी’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माघाठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सुर्वे आणि युवासेना सचिव राज सुर्वे यांच्या पुढाकाराने, शिवसेना व तारामती फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हा अनोखा दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली मराठी संस्कृती आणि भाषेची अस्मिता तरुणाईमध्ये रुजावी, हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे. हा दिमाखदार दहीहंडी सोहळा शनिवार, 5 सप्टेंबर 2026 रोजी बोरीवली पूर्व येथील एक्सप्रेस हायवेजवळील देवीपाडा मैदानावर सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत पार पडणार आहे. या उत्सवाला बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजय दत्त, अनिल कपूर, रवी किशन, राकेश बेदी आणि मल्लिका शेरावत यांच्यासह अनेक मराठी-हिंदी कलाकार हजेरी लावणार आहेत. तसेच, गोविंदांच्या उत्साहात भर घालण्यासाठी मराठी व हिंदी वाद्यवृंद आणि लोकनृत्यांचे विशेष कार्यक्रमही याठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते फुटणार हंडी या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती असणार आहे. महोत्सवातील एक हंडी मुख्यमंत्री, तर दुसरी हंडी उपमुख्यमंत्री फोडणार असल्याची माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली आहे. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार असून, 5 सप्टेंबर रोजी असलेल्या शिक्षक दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमात गुणवंत शिक्षकांचा विशेष सन्मानही करण्यात येणार आहे. गोविंदा पथकांसाठी रोख बक्षिसांची खैरात या दहीहंडीत सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांवर आकर्षक रोख बक्षिसांची उधळण केली जाणार आहे. यामध्ये 5 थरांसाठी 5 हजार, 6 थरांसाठी 7 हजार, 7 थरांसाठी 9 हजार, 8 थरांसाठी 30 हजार, तर 9 थरांसाठी 1 लाख 25 हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. याव्यतिरिक्त विशेष प्रात्यक्षिके आणि मनोरे उभारणाऱ्या पथकांना 10 हजारांपासून 1 लाखापर्यंतची रोख पारितोषिके दिली जाणार असून, महिला गोविंदा पथकांसाठीही विशेष प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. थरातील गोविंदांच्या शिक्षणाचा खर्च उचलणार या उत्सवाचे सर्वात मोठे आणि वेगळे वैशिष्ट्य म्हणजे, दहीहंडी फोडणाऱ्या शेवटच्या थरातील सर्व गोविंदांच्या पुढील शिक्षणाचा संपूर्ण खर्च आमदार प्रकाश सुर्वे आणि नगरसेवक राज सुर्वे स्वतः उचलणार आहेत. न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून आणि सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच या भव्य दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, यामुळे गोविंदा पथकांमध्येही मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *