![]()
चोरीचे मोबाईल विकण्याच्या बहाण्याने चंद्रपूरवरून थेट जिवंत स्फोटके (डेटोनेटर) घेऊन रेल्वेने नागपूर गाठणाऱ्या एका आरोपीला लकडगंज पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र रामलाल विश्वकर्मा (वय ३५, रा. बालोद, छत्तीसगड) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २ जिवंत कमर्शियल डेटोनेटर आणि १२ मीटर लीड गेज वायर जप्त करण्यात आली. आरोपी राजेंद्र हा चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील ‘डब्ल्युसीएल’ कोल माईन्समध्ये कंत्राटदाराकडे मजूर म्हणून काम करत होता. कंत्राटदाराने पगाराचे पैसे न दिल्याच्या रागातून त्याने तेथून ३ मोबाईल आणि स्फोटक साहित्य चोरले. त्यानंतर कोणतीही अडचण न येता तो रेल्वेने प्रवास करत १ सप्टेंबर २०२६ रोजी नागपुरात पोहोचला. आजमशहा चौक परिसरात चोरीचे मोबाईल विकण्याच्या प्रयत्नात असताना गस्तीवर असलेल्या लकडगंज पोलिसांनी संशयावरून त्याला ताब्यात घेतले. अंगझडती दरम्यान मोबाईलसोबतच २ जिवंत डेटोनेटर मिळून आल्याने पोलिसांना धक्का बसला. पोलिसांनी तात्काळ बॉम्ब शोधक व नाशक पथकाला बोलावले. तज्ज्ञांच्या तपासणीत हे स्फोटक साहित्य अत्यंत धोकादायक आणि जिवंत असल्याचे निष्पन्न झाले. बीडीडीएस पथकाने हे डेटोनेटर सुरक्षितपणे सील करून ‘पेसो’कडे पाठवले असून, सुरक्षिततेसाठी बाजारगाव येथील ‘कोलटेक एनर्जी लिमिटेड’ येथे जमा केले आहेत. न्यायालयाच्या परवानगीने हे स्फोटक साहित्य नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा क्रमांक ४९५/२०२६ अन्वये बीएनएस, आर्म्स ॲक्ट आणि स्फोटक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. न्यायालयाने आरोपीला ५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मोबाईल चोरीच्या बहाण्याने थेट जिवंत डेटोनेटर रेल्वेने नागपुरात आणण्यामागे त्याचा नेमका उद्देश काय होता, यात कोणती मोठी टोळी किंवा देशविरोधी कृत्य तर नाही ना, या दिशेने एटीएस आणि पोलीस सखोल तपास करत आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.
Source link
2 जिवंत डेटोनेटर घेऊन रेल्वेने नागपूर गाठले:चंद्रपूरच्या कोल माईन्समधून स्फोटके चोरणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात