Headlines

मौनाचा महामेरू हरपला!:संभाजीनगरमध्ये भीषण अपघात; गुंज येथील कालिदास महाराजांचे निधन, भावजयीचाही मृत्यू




मराठवाड्याच्या आध्यात्मिक विश्वावर आज पहाटे काळाने अत्यंत मोठा आणि घाला घातला. तब्बल चार दशके (40 वर्षे) अखंड मौनव्रत धारण करून शब्दांशिवाय लाखो भाविकांच्या आयुष्याला दिशा देणारे, दत्त संप्रदायाचे श्रद्धास्थान परमपूज्य कालिदास महाराज यांचे बीड बायपासवर झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात दुर्दैवी निधन झाले. अपघातात कालिदास महाराज यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या बातमीने संपूर्ण मराठवाड्यावर शोककळा पसरली आहे. कसा घडला अपघात? परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील श्रीक्षेत्र गुंज येथील रहिवासी असलेले कालिदास महाराज हे वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुजरात येथील श्रीक्षेत्र गरुडेश्वर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेऊन आपल्या सहकाऱ्यांसह गुंजकडे परतत असताना, छत्रपती संभाजीनगरच्या बीड बायपास परिसरात त्यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला. घटनास्थळीच प्राणज्योत मालवली अपघाताची भीषणता एवढी होती की, महाराज आणि त्यांच्या भावजय स्मिता बोरीकर यांचा जागीच मृत्यू झाला. वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला असून, सध्या त्याच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मौनातून समाजप्रबोधन: एक अलौकिक प्रवास कालिदास महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते एका शांत क्रांतीचे प्रणेते होते. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी अखंड मौनव्रत पाळले होते. एकही शब्द न बोलता त्यांनी केवळ आपल्या अस्तित्वाने, साध्या राहणीमानाने आणि डोळ्यांतील करुणेने हजारो भाविकांना व्यसनमुक्ती, सदाचार आणि लोककल्याणाचा मार्ग दाखवला. “ज्यांच्या केवळ दर्शनाने मन शांत व्हायचे, तो शांततेचा झरा आज कायमचा आटला आहे,” अशा शब्दांत त्यांचे भक्त आपल्या भावना व्यक्त करत आहेत. ‘एक मोठी पोकळी निर्माण झाली…’ – मान्यवरांकडून श्रद्धांजली महाराजांच्या अपघाती निधनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून तीव्र दुःख व्यक्त केले जात आहे. आमदार मेघना बोर्डीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त करताना लिहिले: “श्रीक्षेत्र गुंज येथील परमपूज्य कालिदास महाराज यांच्या अपघाती निधनाची बातमी मन हेलावून टाकणारी आहे. समाजाला अध्यात्म, संस्कार आणि मानवतेची शिकवण देणारे एक थोर व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणारी नाही. महाराजांच्या पवित्र स्मृतीस माझे विनम्र अभिवादन.” शोकाकुल ‘गुंज’ नगरी महाराजांच्या पार्थिवावर श्रीक्षेत्र गुंज (ता. पाथरी) येथे अंत्यसंस्कार केले जाणार असून, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी महाराष्ट्रभरातून भाविक गुंजकडे रवाना होत आहेत. संपूर्ण परिसरात सध्या केवळ डोळ्यातले अश्रू आणि सुन्न शांतता उरली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *