![]()
डोंबिवली येथील शास्त्रीनगर महानगरपालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) महाराष्ट्र राज्य शाखेने राज्यव्यापी बंदची घोषणा केली आहे. सोमवार, २० जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपासून ते मंगळवार, २१ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत, असे २४ तास राज्यातील सर्व नियमित आरोग्य सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आंदोलनाला ॲलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी या सर्व वैद्यकीय शाखांचे डॉक्टर, परिचारिका संघटना आणि पॅरामेडिकल स्टाफ पाठिंबा देणार आहेत. या २४ तासांच्या बंद दरम्यान, सर्व रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आणि नियोजित शस्त्रक्रिया पूर्णपणे बंद राहतील. मात्र, सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी आपत्कालीन सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), प्रसूती सेवा आणि जीवनावश्यक उपचार कोणत्याही अडथळ्याविना अविरत सुरू राहतील, असे ‘आयएमए’ने स्पष्ट केले आहे. हे आंदोलन कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून, डॉक्टरांना सुरक्षित आणि निर्भय वातावरण मिळावे यासाठीचा लढा असल्याचे संघटनेने म्हटले आहे. ‘आयएमए’ने या संदर्भात सरकारकडे प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. यामध्ये डोंबिवली हल्ल्यातील आरोपींवर कोणतीही राजकीय ढवळाढवळ न करता तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, ‘महाराष्ट्र मेडीकेअर सेवा व्यक्ती आणि मेडीकेअर सेवा संस्था कायदा, २०१०’ मध्ये तातडीने सुधारणा करून हा कायदा अधिक कडक करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे. यामध्ये अजामीनपात्र गुन्हा नोंदवणे, फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे खटले चालवणे आणि रुग्णालयांमध्ये २४ तास सुरक्षा यंत्रणा सक्तीची करणे या मुद्द्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सरकारने ९ ऑगस्ट २०२६ पर्यंत या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर ‘युनायटेड मेडिकल फ्रंट’च्या बॅनरखाली संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा इशारा ‘आयएमए’ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉ. संतोष कुलकर्णी आणि सचिव डॉ. विक्रांत देसाई यांनी दिला आहे.
Source link
डोंबिवली हल्ल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय सेवा बंद:20 जुलै रोजी 'आयएमए'चा राज्यव्यापी बंदचा इशारा, सर्व वैद्यकीय संघटनांचा पाठिंबा