Headlines

भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक:उपसंचालक शेलार यांचे आवाहन, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या 54 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम




भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या (जीएसडीए) ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपसंचालक प्रकाश शेलार यांनी भूजल संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे आवाहन केले. भूजल ही राज्याची अमूल्य नैसर्गिक संपत्ती असून तिचे शास्त्रीय व्यवस्थापन, संवर्धन आणि शाश्वत वापर महत्त्वाचा आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास वरिष्ठ खोदन अभियंता मनोज सुरडकर आणि वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. कैलास आहेर प्रमुख उपस्थित होते. विभागीय कार्यालयात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षीय भाषणात शेलार यांनी सांगितले की, बदलत्या हवामानामुळे आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता भूजलावर ताण वाढत आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जलसंधारण आणि भूजल पुनर्भरणाच्या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा. वरिष्ठ खोदन अभियंता मनोज सुरडकर यांनी महाराष्ट्राच्या भूगर्भाची माहिती दिली. राज्याचा सुमारे ९२ टक्के भूभाग कठीण खडकाचा असल्याने भूजल साठवण क्षमता मर्यादित आहे. त्यांनी भूजल व्यवस्थापनासमोरील आव्हाने स्पष्ट केली आणि गेल्या ५४ वर्षांत जीएसडीएने भूजल सर्वेक्षण, पिण्याच्या पाण्याचे स्रोत शोधणे, जलगुणवत्ता तपासणी, भूजल पुनर्भरण आणि जलसंधारण क्षेत्रात केलेल्या कार्याचा आढावा घेतला. वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. कैलास आहेर यांनी जलसंवर्धनासाठी जनसहभाग, पर्जन्यजल संधारण आणि भूजल पुनर्भरणाची आवश्यकता अधोरेखित केली. जलसुरक्षित महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाच्या योजनांसोबतच नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमात जल जीवन मिशन, राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्प आणि अटल भूजल योजना अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. भूजल पुनर्भरण, पर्जन्यजल संधारण, पाणी बचत आणि गुणवत्तापूर्ण पिण्याच्या पाण्याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. सोहम ढवळे, वरिष्ठ भूभौतिक तज्ज्ञ इर्शाद शेख, सहायक भूवैज्ञानिक अरुणा खरात, सहायक रसायनी संजय पाटील, उपअभियंता अविनाश ओहळ आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जलसंवर्धन व भूजल संरक्षणाची सामूहिक प्रतिज्ञा घेतली. वर्धापन दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. तसेच, महात्मा गांधी विद्यापीठ आणि देवगिरी महाविद्यालय येथील भूगर्भशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी विभागाला भेट देऊन भूजल प्रयोगशाळा, जलगुणवत्ता परीक्षण आणि भूजल संशोधनाच्या कार्याची माहिती घेतली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *