![]()
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उबाठा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नागपूर येथील उद्धव ठाकरे यांचे ‘रामरक्षा पठण’ म्हणजे निव्वळ ढोंगीपणा असल्याचे बावनकुळे म्हणाले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केले. बावनकुळे म्हणाले की, अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे निमंत्रण असताना उद्धव ठाकरे गेले नाहीत. आता जनाधार गमावल्यानंतर त्यांना प्रभू श्रीरामाची आठवण येत आहे. ठाकरेंनी प्रभू श्रीरामाला राजकारणाचा विषय बनवल्याने त्यांच्या या भूमिकेमुळे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनाही वेदना होत असतील, असे त्यांनी नमूद केले. यावेळी बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांना हिंदुत्व शिकवण्याची गरज नसल्याचे सांगितले. बाबरी आंदोलनावेळी फडणवीस कारसेवा करत होते, तेव्हा हे सर्वजण झोपा काढत होते, असा टोला त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबतही बावनकुळे यांनी भाष्य केले. जयंत पाटील दोन दिवसांपूर्वी माझ्याकडेही दोन तास बैठकीसाठी आले होते, असे त्यांनी सांगितले. अशा भेटी हा राजकारणाचा विषय नसून, राज्याच्या विकासासाठी सल्लामसलत करणे आवश्यक असते. विरोधकांनी राज्याच्या हिताचा विषय मांडल्यास त्यावर सकारात्मक काम करणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे बावनकुळे म्हणाले. महायुतीत कोणतेही मतभेद नसून, विरोधकांकडून केवळ कपोलकल्पित बातम्या पेरल्या जात असल्याचा दावा त्यांनी केला. राहुल गांधींचे विचार न पटल्यामुळे काँग्रेसचे अनेक खासदार महिला बिलाच्या बाजूने मतदान करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. जे खासदार या बिलाला विरोध करतील, त्यांना जनता निवडणुकीत चांगलाच धडा शिकवेल, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.
Source link
उद्धव ठाकरेंचे रामरक्षा पठण केवळ ढोंग:अयोध्या निमंत्रण नाकारले, आता जनाधार गेल्यावर रामाची आठवण; बावनकुळेंची टीका