![]()
सलग तीन वेळा आयव्हीएफ (IVF) उपचार अयशस्वी झाल्यानंतर अनेक जोडपी मानसिक, शारीरिक आणि आर्थिक तणावात येतात. मात्र, तीन प्रयत्न अपयशी ठरल्याने पालकत्वाची संधी संपते, असा निष्कर्ष काढणे चुकीचे असल्याचे फर्टिलिटी तज्ज्ञांचे मत आहे. अशा वेळी अपयशामागील नेमके कारण शोधून उपचारांची दिशा बदलल्यास पुढील प्रयत्न यशस्वी होऊ शकतात, असे फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. रुपाली तांबे यांनी पुणे येथे सांगितले. डॉ. तांबे यांच्या मते, आयव्हीएफ उपचारांच्या यशावर अनेक घटक परिणाम करतात. भ्रूणाची कमी गुणवत्ता, गर्भाशयातील फायब्रॉईड्स, पॉलिप्स, एंडोमेट्रियमची अपुरी जाडी, हार्मोन्समधील असंतुलन, एंडोमेट्रिओसिस आणि जनुकीय दोष ही काही प्रमुख वैद्यकीय कारणे आहेत. याशिवाय, पुरुषांमधील शुक्राणूंच्या समस्या, धूम्रपान, लठ्ठपणा, ताण आणि अपुरी झोप यांसारख्या जीवनशैलीशी संबंधित कारणांमुळेही आयव्हीएफचे यश कमी होऊ शकते. सलग तीन अपयशांनंतर भ्रूणाची गुणवत्ता, गर्भाशयाचे आरोग्य, हार्मोनल स्थिती आणि आवश्यक असल्यास जनुकीय तपासण्या पुन्हा करण्याचा सल्ला दिला जातो. काही रुग्णांमध्ये एन्डोमेट्रियल रिसेप्टिव्हिटी असेसमेंट (ERA) चाचणीद्वारे भ्रूण हस्तांतरणाची योग्य वेळ निश्चित करता येते. वारंवार प्रत्यारोपण अयशस्वी होत असल्यास निवडक रुग्णांमध्ये इम्युनोलॉजिकल तपासण्या करून त्यानुसार पुढील उपचारांचा विचार केला जातो. पुढील आयव्हीएफचा निर्णय घेताना स्त्रीचे वय, अंड्यांची व भ्रूणांची गुणवत्ता, एकूण आरोग्य, मानसिक तयारी आणि आर्थिक क्षमता यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. काही प्रकरणांमध्ये डोनर एग, डोनर स्पर्म, एम्ब्रियो डोनेशन, सरोगसी किंवा दत्तक हेही पर्याय उपलब्ध असतात. वारंवार अपयशामुळे जोडप्यांना नैराश्य आणि चिंतेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वैद्यकीय उपचारांसोबत समुपदेशन आणि कुटुंबाचा भावनिक आधारही तितकाच महत्त्वाचा असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले आहे.
Source link
सलग तीन वेळा IVF अपयशी?:उपचारांची दिशा बदलणे आवश्यक – डॉ. रुपाली तांबे