![]()
वर्धा जिल्ह्यात एका 12 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे नेते तथा राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी वर्ध्याचे पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची भेट घेऊन या प्रकरणात तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ‘फास्ट ट्रॅक’ कोर्टात खटला चालवून फाशी द्या, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली. पोलीस प्रशासनाशी चर्चा करताना पीडित कुटुंबाच्या सुरक्षेचा आणि न्यायाचा मुद्दा अत्यंत आक्रमकपणे मांडला. दानवे यांच्या प्रमुख मागण्या: जलद गतीने तपास: या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास कोणत्याही दबावाशिवाय, सखोल आणि जलद गतीने केला जावा. फास्ट ट्रॅक कोर्ट: खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशी किंवा कठोरात कठोर कायदेशीर शिक्षा दिली जावी. पीडित कुटुंबाला धीर: पीडित कुटुंबाला तात्काळ कायदेशीर व आर्थिक मदत मिळवून द्यावी. शिवसैनिकांसह पोलीस ठाण्यात ठिय्या पोलीस अधीक्षकांची भेट घेताना अंबादास दानवे यांच्यासोबत शिवसेना (UBT) वर्धा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची मोठी फौज उपस्थित होती. यामध्ये जिल्हाप्रमुख अनंत देशमुख, राजेंद्र खूपसरे, जिल्हा संघटक प्रमोद बोंबले, रवींद्र चव्हाण, प्रमोद भटे, सतीश धोबे, मनोज देवके, संजय पांडे, पंकज मयेकर, विलास वैद्य आणि कोडमकरताई यांचा प्रामुख्याने समावेश होता. “अशा नराधमांना समाजात जगण्याचा कोणताही अधिकार नाही. पोलीस प्रशासनाने न्यायालयात भक्कम बाजू मांडून या नराधमाला फाशीची शिक्षा होईल, हे पाहावे. शिवसेना या पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.”— अंबादास दानवे, शिवसेना नेते या घटनेमुळे संपूर्ण वर्धा जिल्ह्यात तीव्र संतापाची लाट असून, पोलीस प्रशासन या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Source link
जलद न्याय द्या:वर्धा अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपीला तात्काळ फासावर लटकवा!; अंबादास दानवेंचा पोलीस अधीक्षकांकडे तीव्र संताप