![]()
३१ ऑक्टोबर २०२६ रोजी गुरूचा सिंह राशीत प्रवेश होताच नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ पर्वाला प्रारंभ होणार आहे. या दिवसापासून ते २४ जानेवारी २०२७ पर्यंत विवाहासह बहुतांश मंगल कार्यांसाठी नियमित शुभमुहूर्त नसल्याने राज्यभरातील हजारो विवाह पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. परिणामी विवाह हॉल, केटरर्स, डेकोरेशन, बँड, फोटोग्राफी आणि इतर विवाहाशी संबंधित व्यवसायांवरही या कालावधीचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पंचांगकारांच्या माहितीनुसार, गुरू सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर मघा नक्षत्र आणि पूर्वाफाल्गुनी नक्षत्राच्या पहिल्या चरणात भ्रमण करणारा कालावधी हा ३१ ऑक्टोबर २०२६ ते २४ जानेवारी २०२७ पर्यंत असल्याने या काळात नियमित विवाहमुहूर्त दिले जात नाहीत. सनातन परंपरेनुसार सिंहस्थ हा स्नान, दान, जप, तप आणि धार्मिक साधनेचा पर्व मानला जातो. त्यामुळे विवाहासारखी मंगल कार्ये टाळण्याची परंपरा अनेक पिढ्यांपासून पाळली जात आहे. मंगल कार्याऐवजी धार्मिक उपासनेला प्राधान्य : नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ पर्वाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या काळात लाखो भाविक गोदावरी स्नान, विविध धार्मिक विधी व साधना करण्यासाठी येथे येतात. त्यामुळे धार्मिक मंगल कार्यांऐवजी अध्यात्मिक उपासनेला प्राधान्य असते. अत्यावश्यक प्रसंगी ‘आपत्कालीन मुहूर्ता’चा पर्याय : नियमित विवाहमुहूर्त उपलब्ध नसले तरी अत्यंत अपरिहार्य परिस्थितीत ‘आपत्कालीन मुहूर्त’ काढून घेण्याची शास्त्रमान्य परंपरा आहे. परदेशस्थ वधू-वर, सैन्य सेवेमुळे मर्यादित रजा मिळणे, गंभीर कौटुंबिक कारणे किंवा इतर निकडीच्या परिस्थितीत ज्योतिषतज्ज्ञ कुंडली, ग्रहस्थिती आणि शास्त्राधारित निकषांचा अभ्यास करून असे मुहूर्त निश्चित करतात. दिव्य मराठी एक्स्पर्ट: माेहन दाते, पंचांगकर्ते आपत्काल हा सापेक्ष; त्याचा वापर विशेष परिस्थितीतच करावा सिंहस्थकाळ हा साधना, दान, जप आणि स्नानाचा धार्मिक पर्व मानला जातो. त्यामुळे या काळात मंगल कार्ये न करण्याची परंपरा आहे. तरीही अत्यंत निकडीच्या प्रसंगी शास्त्रानुसार आपत्कालीन मुहूर्ताची व्यवस्था आहे. मात्र वापर विशेष परिस्थितीत करावा. या स्थिती कालपरत्वे अशा : पूर्वीच्या काळी बालवयात विवाह हाेत. त्यानंतर मुली वयात येत असत. अशा वेळी वयात आलेल्या मुलीचा रजाेकाल हा आपत्काल मानला जात असे. आधुनिक काळात वयाच्या तिशीनंतरही विवाह हाेतात. त्यात मुहूर्त नाही म्हणून १ वर्ष थांबणे अशक्य असते, ही स्थितीदेखील आपत्काल समजता येते. गाेदावरीचा उत्तर काठ व गंगेचा दक्षिण काठ येथे सिंहस्थातील वर्षभर विवाह करता येत नाहीत. महाराष्ट्रात गाेदावरीच्या उत्तरकाठी छत्रपती संभाजीनगर, अकाेला, अमरावती हा भाग येताे. त्यात सिंहस्थाच्या वर्षभर विवाह व्यर्ज असतात. तर, गंगेच्या दक्षिण काठाच्या निकषानुसार नांदेड, परभणी, लातूर, परभणी येथे विवाह केलेला चालताे. वर्ज्य स्थितीत आपत्कालीन मुहूर्त काढता येताे. शक्यताे सिंहस्थ संपल्यावरच विवाहांना प्राधान्य सिंहस्थ पर्वकाळात नियमित विवाहमुहूर्त दिले जात नाहीत. मात्र काही अपरिहार्य कारणे असल्यास शास्त्रमान्य पद्धतीने कुंडलीचा अभ्यास करून ‘आपत्कालीन मुहूर्त’ निश्चित करता येतो. हा अपवाद असून, शक्यतो सिंहस्थ संपल्यानंतरच विवाह करण्यालाच प्राधान्य दिले जाते. -नरेंद्र धारणे, धर्म अभ्यासक
Source link
सावधान ! शुभमंगलांना सिंहस्थात 3 महिने विराम:सिंहस्थ पर्वाची सुरुवात होताच नेहमीच्या मुहूर्तांना लागणार ब्रेक