![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत गेल्या दोन दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवारांच्या रात्री उशिरा भेटीगाठी झाल्या. त्यामुळे संशयाच्या गाठी निर्माण झाल्या आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपदासाठी प्रफुल्ल पटेलांचा प्रयत्न हाणून पाडत मंत्रिपदासाठी खासदार पार्थ पवार लाॅबिंग करत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची गुरुवारी रात्री उशिरा भेट घेतली. त्यामुळे पटेल नाराज असल्याची चर्चा आहे. १४ जुलै रोजी सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांना भेटले. त्या वेळी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटीलही उपस्थित होते, असे म्हटले गेले. अर्थमंत्रिपद मिळवण्यासाठी पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले होते, अशी चर्चा आहे. त्याचे पाटील यांनी खंडन केले. मात्र, तटकरे, पटेल परस्पर मुख्यमंत्र्यांना भेटल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नाराज झाल्या, असे सूत्रांनी सांगितले. त्यावर तटकरेंनी सारवासारव केली की, मी विकासकामांसाठी मुख्यमंत्र्यांकडे गेलो होतो. तरीही यापुढे अशा भेटीपूर्वी सुनेत्रा पवारांना पूर्वकल्पना देणार आहे. यानंतर १६ जुलै रोजी पार्थ पवारांनी मुख्यमंत्र्यांची तर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली. पाटील यांच्या भेटीमुळे शिंदेंचा गुरुवारचा दिल्ली दौरा रद्द झाला. तर पार्थ पवार-मुख्यमंत्री भेटीची तटकरेंना कोणतीही माहिती नव्हती, असेही समोर आले आहे. इनसाइड स्टोरी: पटेलांविरुद्ध मोर्चेबांधणी सूत्रांनी सांगितले की, प्रफुल्ल पटेलांना रोखण्यासाठी पार्थ पवार समर्थकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष उदय आहेर यांनी सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवले आहे. त्यात लंडन रिटर्न आणि उमदे नेतृत्व असलेल्या पार्थ यांना केंद्रात मंत्री करण्याची मागणी केली आहे. २०१९ च्या लोकसभेत पराभवानंतर काही ‘अनाजीपंतांनी’ पार्थ यांना हिणवले, असा आरोपही या पत्रात आहे.
Source link
मुख्यमंत्री फडणवीसांशी 4 नेत्यांच्या भेटीने संशयाच्या ‘गाठी’:पाटील, तटकरे, पटेलांपाठोपाठ पार्थही भेटले