Headlines

चांदवडचा घनकचरा गैरव्यवहार फाईल शिवसेना सचिवांकडे सूपूर्त:वेतनातील तफावत आणि शासकीय निधीच्या अपहाराचे आरोप‎




नगरपरिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन आणि साफसफाई कंत्राटातील कथित घोटाळा, अनियमितता तसेच शासकीय निधीच्या अपहारासंदर्भातील पुराव्यांची फाईल शिवसेनेच्या नगरसेवकांनी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे सुपूर्द केली. या प्रकरणाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. चांदवड नगरपरिषदेचे शिवसेना गटनेते संदीप उगले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात तालुकाप्रमुख नीलेश ढगे, नगरसेवक सुधीर कबाडे, प्रदीप बनकर, राजू बागवान आणि सुनील मोरे यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने कथित गैरव्यवहारासंदर्भातील तांत्रिक व कायदेशीर पुरावे सादर केले. नगरसेवकांनी केलेल्या आरोपानुसार, निविदेतील अटींप्रमाणे सफाई कामगारांना प्रतिदिन ६२२ रुपये किमान वेतन देणे बंधनकारक असताना प्रत्यक्षात केवळ ३८० रुपये दिले जात असून, यातून वार्षिक सुमारे ४७.७१ लाख रुपयांचा गैरव्यवहार होत आहे. तसेच प्रत्यक्ष काम न करणाऱ्या १० बोगस कामगारांची नावे हजेरीपत्रकात दाखवून शासकीय निधीचा अपहार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. मे, जून आणि जुलै २०२६ या तीन महिन्यांपासून कामगारांचे वेतन थकीत असल्याने त्यांच्या कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवल्याचा दावाही शिष्टमंडळाने केला. वेतन थेट बँक खात्यात जमा करणे बंधनकारक असतानाही रोख स्वरूपात पैसे देऊन पुरावे लपविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला. याशिवाय कामगारांना भविष्यनिर्वाह निधी (पीएफ), विमा, साप्ताहिक सुट्टी तसेच कायद्यानुसार देय असलेले ओव्हरटाईमचे लाभही दिले जात नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित कंत्राट तातडीने रद्द करून संबंधित संस्थेला काळ्या यादीत टाकावे, तसेच शासकीय निधीचा अपहार आणि कामगारांची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *