Headlines

वाकडमध्ये मॅग्नमच्या ग्लोबल सेंटरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन:पुणे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये देशात अग्रेसर राहील; हजारो रोजगार निर्माण होतील




पुणे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्सचे (जीसीसी) प्रमुख केंद्र म्हणून वेगाने विकसित होत आहे. पुण्यात सध्या 130 हून अधिक जीसीसी कार्यरत आहेत आणि पुढील एका वर्षात ही संख्या 800 पेक्षा जास्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. जीसीसी क्षेत्रात पुण्याने देशात पहिले स्थान मिळवावे, हे राज्य सरकारचे लक्ष्य असल्याचेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री वाकड येथील ईओएन वेस्ट आयटी पार्कमध्ये मॅग्नम आईस्क्रीम कंपनीच्या ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी आमदार अमित गोरखे, शंकर जगताप, उद्योग, गुंतवणूक व सेवा विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, मुख्यमंत्र्यांचे गुंतवणूक व धोरण सल्लागार कौस्तुभ धवसे, मॅग्नम आईस्क्रीम कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी अभिजीत भट्टाचार्य, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह अनेक उद्योजक व कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र हे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी देशातील एक महत्त्वाचे आणि पसंतीचे गुंतवणूक केंद्र बनले आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. पुण्यात जागतिक कंपन्यांकडून ग्लोबल व्यवसाय सेवा केंद्रे सुरू करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे शहरातील उद्योगपूरक वातावरण आणि कुशल मनुष्यबळाची पावती आहे. मॅग्नमचे पुण्यातील हे केंद्र एक हजारांहून अधिक थेट रोजगाराच्या संधी निर्माण करेल, तसेच अप्रत्यक्ष रोजगारालाही चालना मिळेल. कंपनीच्या जागतिक व्यवसाय प्रक्रिया अधिक मजबूत करण्यासाठी या केंद्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), स्वयंचलित तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. उत्पादन, वितरण आणि ग्राहक अनुभवाशी संबंधित प्रक्रिया अधिक प्रभावी करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. सरकार आणि उद्योग क्षेत्राने एकत्र काम केल्यास गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला चालना देणारी मजबूत परिसंस्था तयार होते. राज्यात गुंतवणूक करणाऱ्या उद्योगांना आवश्यक ते सहकार्य आणि अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबईतील प्रादेशिक मुख्यालयासोबत पुण्यात सुरू झालेले हे ग्लोबल बिझनेस सोल्युशन्स सेंटर मॅग्नमच्या महाराष्ट्रातील विस्ताराला नवी दिशा देईल, असे फडणवीस म्हणाले. पुण्यातील औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधा अधिक मजबूत करून ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्ससाठी ते आणखी आकर्षक केंद्र बनवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हिंजवडीसह पुण्यातील आयटी क्षेत्राशी संबंधित पायाभूत सुविधांचे प्रश्न सोडवण्यावर सरकारचे विशेष लक्ष आहे. उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना उद्योग क्षेत्राकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *