“आर्थिक आणि फिनटेक क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा आघाडी घेतली असून चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत मुंबई आणि पुण्याने मिळून बेंगळुरूला मागे टाकले आहे. आज देशात आलेल्या एकूण फिनटेक गुंतवणुकीपैकी तब्बल ६१ टक्के गुंतवणूक एकट्या मुंबईत झाली आह
.
या दौऱ्यात त्यांनी मॅग्नमच्या ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर’चे उद्घाटन आणि बजाज फिनसर्व्हच्या देशातील सर्वात मोठ्या फिनटेक मुख्यालयाचे भूमिपूजन केले. या विकासकामांसोबतच त्यांनी पुण्यात सुरू असलेला डीजे वाद, विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ला आणि त्यांच्या चर्चेत असलेल्या शुद्ध मराठीवरही दिलखुलास भाष्य केले.
पुण्यात दोन मोठे जागतिक प्रकल्प; 40 हजार रोजगारनिर्मिती
पुण्यातील गुंतवणुकीचा आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेताना फडणवीस म्हणाले, “जगातील 100 वर्षे जुनी आणि अग्रगण्य आईस्क्रीम कंपनी असलेल्या मॅग्नमने आपले अत्याधुनिक ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर पुण्यात सुरू केले आहे. या केंद्रातून जगभरातील कामकाजाचे नियंत्रण आणि व्यवस्थापन केले जाईल.”
“बजाज फिनसर्व्हच्या देशातील सर्वात मोठ्या फिनटेक मुख्यालयाचे भूमिपूजन झाले आहे. सुमारे ७२ लाख चौरस फुटांची ही इमारत पूर्णपणे पर्यावरणपूरक (सस्टेनेबल) आणि अत्याधुनिक असेल. या एकाच कॅम्पसच्या माध्यमातून सुमारे 40 हजार उच्चशिक्षित तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.”
प्रशासनाशी कामाची स्पर्धा
“40 हजार लोक या मुख्यालयात कार्यरत राहणार असल्याने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्ता रुंदीकरण, उड्डाणपूल आणि एका पर्यायी पुलाची मागणी व्यवस्थापनाने केली आहे. कंपनी तीन वर्षांत इमारत उभी करेल; मात्र त्यांची इमारत पूर्ण होण्यापूर्वीच प्रशासनाने हे रस्ते व पूल पूर्ण करावेत, अशी थेट स्पर्धाच आम्ही अधिकाऱ्यांना लावून दिली आहे.”

केवळ कायद्याच्या बडग्याने नाही, तर चर्चेतून डीजेचे स्तोम संपवू
पुण्यातील डीजेबंदी आणि विद्यानंद बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या मुद्द्यावर गृहमंत्र्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “बापट यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. लोकशाहीत मतभेद असू शकतात, भिन्न विचारप्रवाह असू शकतात; पण मत मांडणाऱ्यावर हिंसा करणे अजिबात योग्य नाही.”
“केवळ कायद्याचा बडगा उगारून प्रथा बंद होत नाहीत, तर लोकांना विश्वासात घेऊन मार्ग काढावा लागतो. पुणे पोलीस आयुक्तांशी माझी चर्चा झाली असून भूकंप आल्यासारखा जो प्रचंड आवाज (बेस) होतो, तो थांबवण्यावर बहुतांश मंडळांचे एकमत झाले आहे. नागरिकांच्या सहभागानेच डीजेचे हे स्तोम शमवले जाईल आणि यंदाचा उत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा होईल.”
एकसंध धोरण (पॉलिसी) टप्प्याटप्प्याने
राज्यव्यापी डीजे धोरणाबाबत विचारले असता ते म्हणाले, “धोरण एका रात्रीत तयार होत नाही. ज्या ज्या ठिकाणी चर्चा झाली, तिथे ९० ते ९५ टक्के लोक सहकार्य करण्यास तयार झाले आहेत. चर्चेतून एकमत घडवून मगच संपूर्ण राज्यासाठी आदेश काढले जातील.”
बापटांची मराठी ट्रेंडिंग; शब्द समजून घेण्यासाठी मला ट्युशन घ्यावी लागेल!
विद्यानंद बापट यांच्या प्रमाण आणि संस्कृतप्रचुर मराठी भाषेवर विचारलेल्या प्रश्नावर फडणवीसांनी हसतमुख दाद दिली. “सध्या बापट यांची मराठी सोशल मीडियावर चांगलीच ट्रेंडिंग आहे. त्यांच्या बोलण्यातून अस्खलित आणि शुद्ध मराठीचा एक सुंदर नमुना पाहायला मिळतो. केवळ बापटच नव्हे, तर जेव्हा कोणीही अशी समृद्ध भाषा बोलतो तेव्हा ऐकून मनाला आनंद वाटतो.”
सर्वसमावेशक मांडणीची अपेक्षा
“ते जशी सुंदर भाषा वापरतात, तशीच त्यांनी आपले विचार मांडताना इतरांना त्रास होणार नाही अशा ‘अकोमोडेटिव्ह’ (सर्वसमावेशक) पद्धतीने मांडणी करावी. आता या ‘अकोमोडेटिव्ह’ शब्दासाठी त्यांनी नेमका कोणता शुद्ध मराठी शब्द वापरला असता, हे समजून घेण्यासाठी मला त्यांच्याकडून ट्युशनच घ्यावी लागेल,” अशी मिश्कील टिप्पणी फडणवीस यांनी केली.
हेही वाचा…
जिवंत राहिलो तर रविवारी मोर्चात नक्की सहभागी होणार!:मारहाणीनंतर विद्यानंद बापट यांची पत्रकार परिषद; डीजे, रोजगार आणि ‘सिटीझन ॲक्टिव्हिझम’वर परखड भाष्य

टिळक रस्त्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर अवघ्या 24 तासांत सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी पत्रकार परिषद घेत आपली आक्रमक आणि रोखठोक भूमिका पुन्हा एकदा मांडली. “माझ्यावर झालेला भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी आहे. नरेंद्र दाभोलकरांसारख्या विचारवंतांचा सकाळी मॉर्निंग वॉकला गेल्यावर खून झाला होता, त्यामुळे पुढे काय होईल हे सांगता येत नाही; पण जर मी जिवंत राहिलो आणि जाण्याजोग्या परिस्थितीत असेन, तर रविवारी पुण्यात निघणाऱ्या मोर्चात नक्की सहभागी होईन,” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या पोलीस संरक्षणाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले, मात्र पोलिसांनी दिलेल्या सूचनेनुसार उघड्यावर पत्रकार परिषद न घेता बंदिस्त जागेत माध्यमांशी संवाद साधला. येथे वाचा संपूर्ण बातमी