![]()
सकाळचे सात वाजण्याआधीच मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांच्या रांगा… हातात शाडू माती घेऊन बाप्पाला आकार देण्यासाठी आतुर झालेले हजारो हात… एका बाजूला बासरी आणि तबल्याचे सूर, तर दुसरीकडे ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष… आणि काही मिनिटांतच जालन्याच्या नावावर नवा विश्वविक्रम नोंदवला गेला! एकाच ठिकाणी, एकाच वेळी तब्बल 5,348 शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करून जालनेकरांनी विक्रमाची नवी नोंद केली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त दैनिक ‘दिव्य मराठी’ आणि अद्विक क्लबच्या पुढाकारातून, तसेच जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि महापालिका प्रशासनाच्या सहकार्याने जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर ही भव्य गणेशमूर्ती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या उपक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत 5,348 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार केल्या, तर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी जवळपास 2 हजार पालक आणि शिक्षक मैदानावर उपस्थित होते. 7.45 वाजताच बंगळुरूचा विक्रम मोडला! या उपक्रमासाठी जालन्यातील तब्बल 8 हजार नागरिकांनी ऑनलाइन मोफत नोंदणी केली होती. प्रत्यक्ष कार्यशाळेसाठी सकाळी 7 वाजताची वेळ देण्यात आली होती. मात्र, उत्साह एवढा होता की विद्यार्थी सकाळी 6.45 वाजल्यापासूनच जेईएस महाविद्यालयाच्या मैदानावर दाखल होऊ लागले. जालना शहरातील अनेक शाळांनी तर पायी रॅली काढत या उपक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे कार्यशाळेचे मैदान विद्यार्थ्यांच्या गर्दीने अक्षरशः फुलून गेले. यापूर्वी बंगळुरूमध्ये 3,308 जणांनी एकाच ठिकाणी आणि एकाच वेळी शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा विक्रम केला होता. जालन्यातील विद्यार्थ्यांनी हा विक्रम सकाळी 7.45 वाजताच मोडीत काढला. मात्र, विक्रम मोडल्यानंतरही मैदानाकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओघ थांबला नाही. अखेर सहभागींची संख्या 5,348 वर पोहोचली आणि एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने शाडू मातीच्या गणेशमूर्ती तयार करण्याचा विक्रम जालन्याच्या नावावर झाला. पाहा या ऐतिहासिक उपक्रमाचे फोटोज… हजारो हातांनी साकारला बाप्पा एकाच वेळी हजारो विद्यार्थी शाडू मातीला आकार देत असल्याचे दृश्य अत्यंत विलोभनीय होते. प्रशिक्षकांच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी माती मळून घेतली आणि टप्प्याटप्प्याने गणेशमूर्ती साकारण्यास सुरुवात केली. कोणी बाप्पाचा चेहरा घडवत होते, तर कोणी सोंड, कान आणि मुकुटाला आकार देत होते. काही वेळातच संपूर्ण मैदानावर हजारो गणेशमूर्ती आकार घेताना दिसू लागल्या. कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या सुरश्री अय्यर यांनी दिलेल्या टप्प्याटप्प्याच्या सूचनांनुसार विद्यार्थ्यांनी मूर्ती तयार केली. त्यामुळे प्रथमच मातीची मूर्ती घडवणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बाप्पाचे सुंदर रूप साकारता आले. जिल्हाधिकारी, आयुक्त आणि सीईओही विद्यार्थ्यांमध्ये बसले या विश्वविक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ विद्यार्थ्यांचाच सहभाग नव्हता. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, महापालिका आयुक्त अंजली शर्मा आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनीही विद्यार्थ्यांसोबत मैदानात बसून स्वतः गणेशमूर्ती तयार केली. तिन्ही वरिष्ठ अधिकारी संपूर्ण वेळ कार्यशाळेत उपस्थित राहिले. प्रशिक्षकांनी सांगितलेल्या पद्धतीनुसार त्यांनीही गणेशमूर्ती साकारली. वरिष्ठ अधिकारी स्वतः विद्यार्थ्यांमध्ये बसून बाप्पाची मूर्ती तयार करत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह आणखी वाढला. यावेळी उद्योजक घनश्याम गोयल, सुनील रायठठ्ठा, गोविंद गोयल, नितीन काबरा, डीवायएसपी अनंत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, संगीता भागवत यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. जात विसरा, माणुसकी विसरू नका कार्यशाळेदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करताना सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. “आज कुठेही गेलं की सर्वप्रथम जात विचारली जाते. चेहरा पाहिल्यानंतर माणूस कोणत्या जातीचा आहे, याचा विचार केला जातो. त्यामुळे समाजात जाती-जातींमध्ये दरी वाढत आहे,” असा आशय मांडत त्यांनी ‘जात विसरा, माणुसकी विसरू नका’ हा संदेश दिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी विविध जाती-जमातींना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केले. त्या काळात समाज एकत्र होता. आज मात्र जातीच्या आधारावर माणसांमध्ये अंतर निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. “चांगला माणूस बना, माणुसकी विसरू नका,” असे आवाहन मित्तल यांनी विद्यार्थ्यांना केले. शिक्षण आणि कौशल्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. जात प्रमाणपत्र असणे पुरेसे नाही; आयुष्यात पुढे जाण्यासाठी शिक्षण आणि कौशल्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहावीत आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी, असे त्यांनी सांगितले. हजारो विद्यार्थी एकत्र येऊन शाडू मातीपासून गणेशमूर्ती घडवत असल्याचे उदाहरण देत अशा प्रकारचे समाजाला एकत्र आणणारे कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. बासरी-तबल्याच्या सुरांत ‘बाप्पा मोरया’चा जयघोष कार्यशाळेदरम्यान मैदानातील वातावरण उत्साहाने भारावून गेले होते. विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्याच्या सूचना दिल्या जात असताना बासरी आणि तबल्याचे स्वर वातावरणात घुमत होते. त्याचवेळी ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. यानंतर ‘हीच अमुची प्रार्थना, अन् हेच अमुचे मागणे…’ या गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. हजारो विद्यार्थ्यांनी आणि उपस्थितांनी एकत्रितपणे गीत गायल्याने वातावरण भावुक झाले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. विश्वविक्रमापुरता नव्हे, तर घराघरात जाणार शाडूचा बाप्पा या उपक्रमाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तयार केलेल्या गणेशमूर्ती केवळ मैदानावर प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. विद्यार्थी याच मूर्तींची गणेशोत्सवात आपल्या घरात प्रतिष्ठापना करणार आहेत. त्यामुळे कार्यशाळा संपल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी आपली मूर्ती अत्यंत काळजीपूर्वक घेऊन जाताना दिसला. अनेक विद्यार्थ्यांनी घरी गेल्यानंतर मूर्तीला नैसर्गिक रंग देणार असल्याचे सांगितले. एका बाजूला जालन्याच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद झाली; दुसऱ्या बाजूला हजारो घरांमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्ती पोहोचल्या. त्यामुळे हा उपक्रम केवळ विक्रमाचा क्षण न राहता पर्यावरणपूरक गणेशोत्सव आणि सामाजिक एकतेचा संदेश देणारा जनसहभागाचा मोठा सोहळा ठरला. 8 हजार नोंदणीपासून 5,348 मूर्तींपर्यंतचा प्रवास या उपक्रमासाठी 8 हजार जालनेकरांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 5,348 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष कार्यशाळेत सहभागी होत एकाच वेळी गणेशमूर्ती तयार केल्या. जवळपास 2 हजार पालक आणि शिक्षकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. बंगळुरूचा 3,308 सहभागींचा विक्रम सकाळी 7.45 वाजता मोडला आणि त्यानंतरही वाढत गेलेली संख्या 5,348 वर स्थिरावली. जालन्याच्या हजारो हातांनी मातीला आकार देत बाप्पाचे रूप साकारले आणि त्याचवेळी शहराने विश्वविक्रमाच्या पानावर आपले नाव कोरले.
Source link
5348 जालनेकरांनी रचला विश्वविक्रम:एकाच ठिकाणी, एकाच वेळी घडवल्या शाडूच्या गणेश मूर्ती; दैनिक दिव्य मराठीचा अद्विक क्लब व जिल्हा प्रशासनासह ऐतिहासिक उपक्रम