Headlines

डीजेविरोधातील लढ्याला संघटनात्मक स्वरूप देणार- विद्यानंद बापट:म्हणाले, ध्वनिप्रदूषणावरील जनजागृती थांबणार नाही




सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी आज पत्रकार परिषदेत घोषणा केली की, गणेशोत्सवासह सार्वजनिक कार्यक्रमांमधील ध्वनिप्रदूषणाविरोधातील लढा आता अधिक व्यापक करून त्याला संघटनात्मक स्वरूप दिले जाईल. पुण्यातील टिळक रस्त्यावर गुरुवारी झालेल्या मारहाणीनंतर बापट प्रथमच माध्यमांसमोर आले होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, व्यक्तीपेक्षा ध्वनिप्रदूषणाचा मूळ मुद्दा महत्त्वाचा आहे आणि यावरील जनजागृती थांबवली जाणार नाही. बापट म्हणाले की, मला स्वतःचे व्यक्तिमत्त्व मोठे करायचे नाही. माझ्याऐवजी मी मांडलेले मुद्दे पुढे गेले पाहिजेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिपूजा घातक असल्याच्या इशाऱ्याचा उल्लेख केला. त्यामुळे सोशल मीडियावर माझ्याबद्दल येणाऱ्या पोस्ट किंवा व्हिडीओंना मी प्रोत्साहन देणार नाही, असेही ते म्हणाले. नागरिकांनी मला वैयक्तिक पाठिंबा देण्याऐवजी ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सवाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. गणेशोत्सवाला विरोध नाही बापट म्हणाले की, गणेशोत्सव किंवा कोणत्याही धर्माच्या सणाला त्यांचा विरोध नाही. सार्वजनिक उत्सव साजरे करताना मोठ्या आवाजामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडू नये आणि वाहतुकीला अडथळा येऊ नये, एवढीच त्यांची भूमिका आहे. डीजे आणि मोठ्या आवाजाच्या स्पीकरमुळे वृद्ध, लहान मुले, विद्यार्थी आणि रुग्णांना त्रास होतो. त्यामुळे नियमांची कडक अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. हल्ल्याप्रकरणी चव्हाणला अटक दरम्यान, बापट यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी संतोष चव्हाण याला अटक केली आहे. बापट यांना चोवीस तास पोलिस संरक्षण देण्यात आले आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कठोर कारवाईचे आश्वासन दिले आहे. मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य हा घटनात्मक अधिकार आहे आणि हिंसा सहन केली जाणार नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या मारहाणीच्या निषेधार्थ रविवारी नागरिकांकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *