![]()
कला, संस्कृती, गायन, वादन, नृत्य, संगीत, साहित्य, क्रीडा आणि पर्यटनाचा अनोखा संगम असलेल्या 38व्या ‘पुणे फेस्टिव्हल’चे उद्घाटन शुक्रवार, 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 वाजता होणार आहे. उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते स्वारगेट येथील गणेश कला-क्रीडा रंगमंचावर हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आयोजक कृष्णकुमार गोयल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी सतीश देसाई, अभय छाजेड, आबेदा इनामदार आणि मयुर नांदे उपस्थित होते. या उद्घाटन सोहळ्याला केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री शंभूराज देसाई आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत विविध क्षेत्रांतील मान्यवरही उपस्थित असतील. उद्घाटन सोहळ्यात ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या 125व्या जयंतीनिमित्त विशेष नृत्याविष्कार सादर केला जाईल. त्यांच्या गाजलेल्या ‘झनक झनक पायल बाजे’ या चित्रपटावर तो आधारित असेल. अभिनेत्री मानसी नाईक आणि सहकलाकार यात सहभागी होणार आहेत. नृत्यगुरू निकिता मोघे यांनी या कार्यक्रमाची संकल्पना व दिग्दर्शन केले आहे. राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला 150 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. यात कथक, भरतनाट्यम आणि ओडिसी या भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींचा संगम दिसेल. नादरूप, कलावर्धिनी डान्स कंपनीसह विविध संस्थांतील 24 नृत्यांगना यात सहभागी होतील. ‘गीत रामायण’मधील निवडक गाण्यांवरही नृत्य सादर केले जाईल. फेस्टिव्हलदरम्यान 19 सप्टेंबरला ‘सूफी संगीत’ कार्यक्रम होईल. 20 सप्टेंबरला ‘केरळ महोत्सव’ आणि ‘हिंदी हास्य कवी संमेलन’ आयोजित केले आहे. 21 सप्टेंबरला ‘मराठी बाणा’ आणि 22 सप्टेंबरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. संस्कृती, कला, सेवा आणि समाजप्रबोधन क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या व्यक्तींना ‘पुणे फेस्टिव्हल पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येईल. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठीतून राहुल सोलापूरकर, तर इंग्रजीतून समीर गुजर करणार आहेत.
Source link
उपराष्ट्रपतींच्या हस्ते 38 व्या पुणे फेस्टिव्हलचे होणार उद्घाटन:स्वारगेटच्या गणेश कला-क्रीडा रंगमंचावर 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान रंगणार फेस्टिव्हल