Headlines

पाणीपट्टीच्या नावाखाली डॉक्टर महिलेची फसवणूक:सायबर चोरट्यांनी डेबिट कार्डची माहिती घेऊन काढले 3.68 लाख रुपये




पाणीपट्टी थकल्याचे सांगून सायबर चोरट्यांनी विमाननगर भागातील एका डॉक्टर महिलेची तीन लाख 68 हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 59 वर्षीय डॉक्टर महिलेने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या विमाननगर भागात राहतात आणि साकोरेनगर भागातील बंगल्यात त्यांचा दवाखाना आहे. चार महिन्यांपूर्वी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातून बोलत असल्याचे सांगून चोरट्यांनी पाणीपट्टी न भरल्याने पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर एक लिंक पाठवली. या लिंकद्वारे महिलेला दहा रुपये ऑनलाइन भरण्यास सांगितले. महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे भरण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी महिलेला डेबिट कार्डद्वारे पैसे भरण्यास सांगितले आणि डेबिट कार्डची माहिती घेतली. गोपनीय माहिती आणि सांकेतिक शब्दाचा गैरवापर करत चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून परस्पर तीन लाख 68 हजार रुपये काढून घेतले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत. ऑनलाइन टास्कच्या आमिषाने फसवणूक दरम्यान, आणखी एका घटनेत, ‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने सायबर चोरट्यांनी एका तरुणाची दोन लाख 98 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार 27 वर्षीय तरुण कोंढव्यातील शिवनेरीनगर भागात राहतो. तो एका खासगी कंपनीत कामाला आहे. सायबर चोरट्यांनी तरुणाच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला आणि घरातून ऑनलाइन पद्धतीने काम करण्याची संधी असल्याचे आमिष दाखवले. चोरट्यांनी तरुणाला या कामात गुंतवणूक केल्यास 20 ते 30 टक्के परतावा मिळेल असे सांगून जाळ्यात ओढले. त्यानंतर तरुणाला पैसे भरण्यास सांगितले. सुरुवातीला तरुणाला काही परतावा दिला, पण त्यानंतर परतावा देणे बंद केले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस या प्रकरणाचा तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *