![]()
नीरा उजवा कालव्यामधून संगीता तलावात पाणी सोडून तो किमान ७५ टक्के भरून दिला जाईल, असे प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण अखेर स्थगित करण्यात आले. तलावात प्रत्यक्षात पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संगीता तलावात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी समाधान फाटे यांच्यासह पाच शेतकरी गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते. गुरुवारी उपोषणाच्या चौथ्या दिवशी नीरा उजवा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. तलावात तातडीने पाणी सोडून तो किमान ७५ टक्के भरून देण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिले. यानंतर प्रशासनाकडून प्रत्यक्षात तलावात पाणी सोडण्यात आले. आश्वासन पूर्ण होताच आणि पाणी सुटल्याची खात्री पटल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतले. यावेळी युवक नेते भगीरथ भालके, प्रणव परिचारक, सहकार शिरोमणीचे उपाध्यक्ष भारत कोळेकर, संचालक तानाजी वाघमोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल, जिल्हा परिषद सदस्य संतोष बागल यांच्यासह परिसरातील नागरिक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
तलाव 75 टक्के भरून देण्याचे नीराउजवा कालवा विभागाचे आश्वासन:तिसंगी तलावात पाणी सोडले, चौथ्या दिवशी उपोषण मागे