.

शहरातील अंबाविहारातील बीएससी प्रथम वर्षाची साडेसतरा वर्षीय विद्यार्थिनीचा तिचा मित्र आनंद भडने गळा चिरून, शरीरावर चाकूने वार करून खून केल्याची घटना गुरुवारी ३ सप्टेंबरला रवी नगरातील हनुमान मंदिर चौकाजवळच घडली. त्या पूर्वी तिने आनंद त्रास देत असल्याचे त्यांच्या कॉमन फ्रेंडला सांगितले होते. हा मित्र त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत असतानाच आनंदने एकतर्फी प्रेमातून तिच्यावर हल्ला केला.त्यात मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान मारेकऱ्याला रात्री साडेनऊ वाजता गोंदियातून पोलिसांनी ताब्यात घेतले
आनंद नंदकिशोर भड (२२, रा. पोही ता. मूर्तिजापूर) असे हल्लेखोराचे नाव आहे. आनंद, मृत तरुणीची ओळख होती. दोन महिन्यांपासून तरुणीने त्याच्याशी बोलणे बंद केले होते. याचा राग मनात धरून ‘माझ्याशी बोल’ असे म्हणत तो त्रास देत होता.गुरुवारी महाविद्यालयात जाण्यास तरुणी दुचाकीवरून निघाली. घरापासून एक ते दीड कि.मी.वर रवी नगरातील हनुमान मंदिर चौकात तो दुचाकीवरून तिथे आला. त्याने वाद घालत चाकू काढून तिच्या गळ्यावर वार केला. त्यात तिला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्याने तिच्या छातीवर दोन, पोटावर तीन वार केले.रक्तबंबाळ तरुणीला रुग्णालयात नेले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.तिचे वडील मजूरी करतात, आई गृहीणी आहे. तिला एक लहान भाऊ आहे. आनंद आणि तरुणीची सुमारे दोन ते अडीच वर्षांपूर्वी पहिली भेट झाली होती. त्यानंतर दोघांची मैत्री झाली आणि त्यांच्यात बोलणे सुरू झाले. आनंदने बि.कॉमचे शिक्षण घेतले आहे. सध्या तो शहरातील गोपालनगर परिसरातील एका एसी रिपेअरिंगच्या दुकानात काम करत होता. मात्र, मागील २० ते २५ दिवसांपासून तो गावी गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. ही घटना घडण्यापूर्वी आणि त्यानंतर शहरातील रवी नगर परिसरातील वीजपुरवठा खंडित होता. त्यामुळे मुख्य चौकात घटना घडूनही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचणी येत आहेत. वीजपुरवठा सुरळीत असता तर संपूर्ण घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद झाला असता, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आनंद त्रास देत असल्याची बाब मुलीने परिसरातील एका तरुणाला सांगितली होती. त्यामुळे १५ दिवसांपूर्वी तो तरुण व मुलीने आनंदची भेट घेतली. यापुढे त्रास देवू नको, असे त्याला सांगितले. नाहीतर मी तुझी पोलिसात तक्रार देईल, असे आनंदला मुलीने बजावले, त्यावेळी आनंदने मुलीची माफी मागितली होती. मात्र आनंदने मंगळवारी त्या मुलीवर चाकूने वार करुन तिला संपवले. हल्ल्यानंतर तरुणीला खासगी रुग्णालयात नेले. काही मिनिटांपूर्वी घरातून निघालेली मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात पोहोचली होती. तिच्या शरीरावरील गंभीर जखमा पाहून कुटुंबीय हादरले. आपल्यासमोर असलेली व्यक्ती आपलीच मुलगी आहे, यावर तिच्या वडिलांचा काही काळ विश्वास बसत नव्हता. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस.(चौकटीत) घटनास्थळी पडलेला विद्यार्थिनीच्या खुनासाठी वापरलेला चाकू.
तुझी पोलिसात तक्रार देईल, असे बजावले होते
वीज खंडित, सीसीटीव्ही फुटेज मिळवण्यात अडचण
जिल्ह्यातील मागील २१ वर्षांतील पाचवी घटना यापूर्वी शहरात एकतर्फी प्रेमप्रकरणातून २००५ मध्ये दीपाली कुलकर्णी, २०१७ मध्ये प्रतिक्षा मेहत्रे, २०१९ मध्ये अर्पिता ठाकरे, जानेवारी २०२० मध्ये धामणगाव रेल्वे येथे एका अल्पवयीन मुलीची कृरपणे हत्या झाली आहे. आजच्या घटनेलासुद्धा एकतर्फी प्रेमाचीच किनार आहे.