![]()
केंद्र शासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी देण्यात येतो. या निधीचा योग्य विनियोग करून ग्रामीण जनतेचे जीवन सुकर करावे. यात प्रामुख्याने पांदण रस्ते, घरकुल, आरोग्य यासोबतच पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यावर भर देण्यात यावा,असे निर्देश खा. बळवंत वानखडे यांनी दिले. जिल्हा नियोजन भवनात खा. वानखडे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार ४ रोजी जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा पार पडली. यावेळी खा.डॉ. अनिल बोंडे, आ. प्रवीण पोटे, आ.गजानन लवटे, आ.प्रवीण तायडे, अशासकीय सदस्य मोरेश्वर वानखडे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, उपविभागीय अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रीती देशमुख आदी उपस्थित होते. जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात प्रामुख्याने रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. चांगल्या रस्त्यांमुळे जिल्ह्यात पायाभूत सुविधा निर्माण होण्यास मदत मिळणार आहे. जिल्ह्यातील काही मार्गाची दुरूस्ती करणे आवश्यक असल्याने या कामांना गती देण्यात यावी. रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करण्याला प्राधान्य देण्यात यावे. त्यासोबतच शेतकऱ्यांसाठी पांदण रस्ते महत्वाचे आहेत. यासाठी पांदण रस्त्यांवर लक्ष केंद्रीत करण्यात यावे. यातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा, असे खासदारांनी सांगितले. गरजूंना आर्थिक सहाय्याच्या योजना महत्वाच्या आहेत. प्रामुख्याने दिव्यांगांना देण्यात येणारी मदत थांबविण्यात येऊ नये. आवश्यकता भासल्यास तालुकास्तरावर शिबिरे घेऊन यूडीआयडी प्रमाणपत्र वाटप करण्यात यावे. यासाठी आवश्यक त्या सुविधा उभारण्यात याव्यात. ग्रामीण भागातील घरकुलांचा प्रश्न महत्वाचा आहे. घरकुल मंजूर झाल्यानंतर संबंधितास पाच ब्रास रेतीचे वाटप करण्यासाठी पास देण्यात यावा. तसेच जवळपास असलेल्या रेतीच्या उपलब्धतेबाबत माहिती देण्यात यावी. तसेच टप्पेनिहाय अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी यंत्रणांनी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले. आरोग्य ही महत्वाची बाब असून यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात. रुग्णवाहिकांना इंधनाचा नियमित पुरवठा होईल, याची दक्षता घेण्यात यावी. मेळघाटात आरोग्याचे प्रश्न असल्याने याठिकाणी रूग्णवाहिका उपलब्ध राहिल, याची दक्षता घेण्यात यावी. आरोग्यासोबतच पाणी पुरवठा महत्वाचे आहे. जलजीवन मिशनमधून पूर्ण करण्यात येणारी कामे तातडीने पूर्ण करावीत. गावात प्रत्यक्ष पाणी पुरवठा सुरू होईल, यासाठी कामे तातडीने पूर्ण करावीत. यामुळे साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविणे शक्य होईल, अशी सुचना खासदारांनी केली.
Source link
शहरातील रस्ते, घरकुल, आरोग्य, पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडवा:खा. वानखडे : ग्रामीण जनतेचे जीवन सुकर करण्याच्या सूचना