Headlines

आरक्षणासाठी जामखेडची बाजारपेठ ठप्प; आंदोलनाला सर्व समाजांची साथ:व्यापारी, व्यावसायिक, नागरिकांचा प्रतिसाद; मुस्लिम समाजाचाही पाठिंबा‎




मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जामखेड शहर व तालुक्यात शुक्रवारी बंद पाळण्यात आला. अखंड मराठा समाजाच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापारी, व्यावसायिक तसेच नागरिकांनी दुकाने व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. सकाळपासूनच शहरातील प्रमुख बाजारपेठा, व्यापारी प्रतिष्ठाने आणि विविध व्यावसायिक आस्थापना बंद असल्याने शहरात शुकशुकाट होता. बंदच्या माध्यमातून मराठा समाजाने आंदोलनाला आपला ठाम पाठिंबा आणि एकजुटीची ताकद दाखवून दिली. यावेळी नगरसेवक वसीम भाई सय्यद यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला मुस्लिम समाजाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. “आम्ही मुस्लिम बांधव मराठा समाजासोबत खांद्याला खांदा लावून या लढ्यात सहभागी आहोत. जुन्या अभिलेखांमध्ये कुणबी म्हणून नोंद असलेल्या मुस्लिम बांधवांनाही शासनाच्या नियमानुसार आरक्षणाचा लाभ मिळावा, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन मराठा समाजाच्या मागण्यांवर सकारात्मक व ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली. या बंदच्या माध्यमातून जामखेड तालुक्यातील मराठा समाजाने एकजुटीची ताकद आणि आंदोलनाला आपला पाठिंबा दाखवून दिला.जामखेडकरांच्या या प्रतिसादाबद्दल अखंड मराठा समाजाच्या वतीने सर्व व्यापारी, व्यावसायिक आणि नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले. न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील : कुंडल राळेभात मराठा समाजाला आरक्षणाचा न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील. शासनाने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील आंदोलनाची दिशा अधिक तीव्र असेल, सत्ताधारी मंत्री किंवा लोकप्रतिनिधी जामखेडमध्ये आल्यास त्यांचा मार्ग अडवून घेराव घालण्यात येईल, असा इशाराही सामाजिक कार्यकर्ते कुंडल राळेभात यांनी दिला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *