![]()
दुष्काळात जनावरांसाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी मोर्शी तालुक्यातील तीन ठिकाणी १२ हेक्टर गाळपेर जमिनीवर चारा लागवड करण्यात आली आहे. दोन महिन्यांत चारा तयार होईल, असा विश्वास जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी व्यक्त केला. येरेकर यांनी रविवारी दापोरी, वाघोली आणि घोडदेव येथील लागवडीची पाहणी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार, उपविभागीय अधिकारी प्रदीपकुमार पवार, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वल्लभ जोशी आणि गटविकास अधिकारी स्वप्निल मकदुम उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात अप्पर वर्धा धरणाच्या दापोरी, वाघोली आणि घोडदेव येथे प्रत्येकी चार हेक्टरवर चारा लावण्यात आला आहे. चारा टंचाई लक्षात घेऊन तलावातील गाळपेर जमीन लागवडीसाठी उपलब्ध करून देण्यात आली. येथे वैरण बियाणे पेरले आहे. कापणीनंतर उपलब्ध पाण्यानुसार पुन्हा चारा तयार होईल. जिल्हाधिकारी येरेकर यांनी पशुपालकांना वैरण बियाण्यांचे संच वाटले आणि परिसरातील चाऱ्याची स्थिती जाणून घेतली. वाघोलीचे सरपंच अक्षय तायवाडे यांनी चाऱ्याची काळजी घेऊन पशुधनासाठी तो उपलब्ध करण्यास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. येरेकर यांनी दापोरीतील चार हेक्टरवरील लागवडीचीही पाहणी केली. चारा पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. लागवडीसाठी तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रवीण सारडे, पशुधन विकास अधिकारी मिलिंद राऊत आणि पोहरा येथील पशुपैदास प्रकल्पाचे वैरण विकास अधिकारी चंद्रशेखर गिरी यांनी पुढाकार घेतला. व्हीबी जी राम जी अंतर्गत मोर्शी तालुक्यातील तीन ठिकाणी १२ हेक्टर गाळपेर जमिनीवर लागवड करण्यात आली आहे. यातून सुमारे ३०० मेट्रिक टन चारा उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. यासाठी मनरेगाचे उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार आणि त्यांची चमू काम करत आहे.
Source link
मोर्शी तालुक्यात 12 हेक्टरवर चारा लागवड:दोन महिन्यांत उत्पादनाचे जिल्हाधिकाऱ्यांचे म्हणणे; 300 मेट्रिक टन चाऱ्याचे उद्दिष्ट