Headlines

पालघरमध्ये बिबट्याचा महिलेवर जीवघेणा हल्ला:बागेत काम करताना थेट झडप, महिनाभरात दुसऱ्या महिलेचा मृत्यू




जिल्ह्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र आहे. जंगल परिसरातून मानवी वस्त्यांकडे बिबट्यांचा वावर वाढत असून, आता नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण झाला आहे. वाणगावजवळील चंडीगाव येथे बागेत काम करत असलेल्या एका महिलेवर बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला. तुळसी सावर (वय 65) असे मृत महिलेचे नाव आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तुळसी सावर या मूळच्या सारसी तालुक्यातील विक्रमगड येथील रहिवासी होत्या. त्या वाणगावजवळील चंडीगाव परिसरात बागेत काम करत होत्या. याचवेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. हल्ला इतका भीषण होता की, त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात दोन महिलांचा मृत्यू पालघर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू होण्याची ही अलीकडच्या काळातील दुसरी घटना आहे. महिनाभरापूर्वी पालघर तालुक्यातील वेवूर येथेही बिबट्याने एका महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात संबंधित महिलेचा मृत्यू झाला होता. त्या घटनेनंतर वनविभागाकडून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची गरज व्यक्त केली जात असतानाच आता चंडीगाव येथे पुन्हा एका महिलेचा बळी गेला आहे. त्यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पालघर, वाणगाव, डहाणू परिसरात बिबट्यांचा वावर वाढला गेल्या वर्षभरापासून पालघर जिल्ह्यातील पालघर, चिंचणी, वाणगाव, तारापूर आणि डहाणू या भागांमध्ये बिबट्यांचा वावर सातत्याने वाढत असल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. यापूर्वी बिबट्यांचा वावर प्रामुख्याने जंगल आणि डोंगराळ भागांपुरता मर्यादित असल्याचे मानले जात होते. मात्र, आता बिबटे नागरी वस्त्यांच्या जवळ तसेच बागायती आणि शेतीच्या परिसरातही दिसू लागले आहेत. विशेष म्हणजे, बागेत किंवा शेतात काम करणाऱ्या नागरिकांना बिबट्यांच्या हल्ल्याचा धोका निर्माण झाला आहे. ग्रामीण भागातील अनेक नागरिकांना रोजच्या कामासाठी घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, शेतमजूर आणि स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पाळीव जनावरांवरील हल्ल्यांच्या घटनांमुळे पशुपालक आणि दुग्ध व्यावसायिकांचीही चिंता वाढली आहे. वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये सातत्याने वाढ होत असताना वनविभागाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापूर्वीही नागरिकांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यानंतरही हल्ल्यांच्या घटना घडत असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या संवेदनशील भागांमध्ये तातडीने पिंजरे लावावेत, गस्त वाढवावी आणि बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; ठोस उपाययोजनांची मागणी एका महिन्याच्या अंतराने दोन महिलांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी शेतात किंवा बागेत कामासाठी जाणाऱ्या महिलांना आणि शेतमजुरांना अधिक सतर्क राहावे लागत आहे. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडतानाही नागरिकांमध्ये भीती आहे. वनविभागाने नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचे आणि बिबट्यांचा वावर असलेल्या भागात एकट्याने जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. मात्र, केवळ सतर्कतेचे आवाहन करून चालणार नाही, तर नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. चंडीगाव येथील घटनेनंतर तरी वनविभागाने तातडीने पावले उचलून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे. हेही वाचा… मुंबईत रस्ते, रेल्वे आणि बेस्टचा प्रवासही असुरक्षित:कांदिवलीत रस्त्यावर ऑइल सांडल्याने 30 मिनिटांत 14 दुचाकी घसरल्या, अनेक जखमी मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कधी लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागतो, तर कधी बेस्ट बसच्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर होणारे अपघातही सातत्याने घडत असताना आता रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात रस्त्यावर ऑइल सांडल्याने अवघ्या 30 मिनिटांत तब्बल 14 दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली. या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी घसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *