Headlines

अमरावतीत 28 फेब्रुवारीला सामूहिक विवाह सोहळा:सूर्यकांतादेवी पोटे ट्रस्टकडून आयोजन; शेतकरी आणि शेतमजुरांना प्राधान्य, नोंदणी 25 जानेवारी 2027 पर्यंत




दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या कुटुंबांना मदत करण्यासाठी अमरावतीत २८ फेब्रुवारीला सामूहिक विवाह सोहळा होणार आहे. वधू-वरांच्या कुटुंबीयांना सर्व व्यवस्था मोफत दिली जाईल, अशी माहिती आमदार प्रवीण पोटे यांनी दिली. सूर्यकांतादेवी पोटे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पी. आर. पोटे पाटील एज्युकेशन ग्रुपने या सोहळ्याचे आयोजन केले आहे. कठोरा रोडवरील पी. आर. पोटे पाटील एज्युकेशनल कॅम्पसमध्ये हा कार्यक्रम होईल. संस्थेकडून सहकार्य केले जाईल आणि राज्य शासनाकडूनही मदत मिळवून दिली जाईल, असे पोटे म्हणाले. अल नीनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी झाला आणि पिकांची स्थिती खराब झाली. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांकडे काम नसल्याने शेतमजुरांची आर्थिक स्थितीही बिकट झाली आहे. या कुटुंबांवरील विवाहाचा खर्च कमी व्हावा आणि विवाहाचे विधी विनासायास पार पडावेत, यासाठी सोहळा आयोजित केला आहे. सहभागी होणाऱ्यांच्या संख्येवर मर्यादा ठेवलेली नाही, असे पोटे यांनी सांगितले. नोंदणी सुरू झाली असून इर्विन चौकातील मांगीलाल प्लॉट येथे असलेल्या त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात करता येईल. नोंदणीची अंतिम तारीख २५ जानेवारी २०२७ आहे. वधू किंवा वर यापैकी एक जण अमरावती जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. पत्रकार परिषदेला आमदार प्रवीण पोटे यांच्यासह शिक्षक भारतीचे पदाधिकारी दिलीप निंभोरकर, सूर्यकांतादेवी चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी घनश्याम पेठे, रामदेव जोशी, प्रकाश पुंड, ज्ञानेश वणवे, सुदाम पंडागरे, बबनराव आवारे, भागवतराव खांडे आणि विवेक हाडोळे उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *