Headlines

मुंबईत रस्ते, रेल्वे आणि बेस्टचा प्रवासही असुरक्षित:कांदिवलीत रस्त्यावर ऑइल सांडल्याने 30 मिनिटांत 14 दुचाकी घसरल्या, अनेक जखमी




मुंबईकरांचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत असल्याचे चित्र समोर येत आहे. कधी लोकलमधील गर्दीमुळे प्रवाशांना जीव गमवावा लागतो, तर कधी बेस्ट बसच्या अपघातांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. भरधाव वाहनांमुळे रस्त्यांवर होणारे अपघातही सातत्याने घडत असताना आता रस्त्यावर सांडलेल्या ऑइलमुळे दुचाकीस्वारांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. मुंबईतील कांदिवली पूर्व परिसरात रस्त्यावर ऑइल सांडल्याने अवघ्या 30 मिनिटांत तब्बल 14 दुचाकी घसरून अपघात झाल्याची घटना 1 नोव्हेंबर रोजी घडली. या अपघातांमध्ये अनेक दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. एकाच ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने दुचाकी घसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली पूर्व येथील उत्तर प्रादेशिक पोलीस कार्यालयासमोरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले होते. मात्र, रस्त्यावर ऑइल असल्याची माहिती वाहनचालकांना नसल्याने या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांना त्याचा अंदाज आला नाही. दुचाकींची चाके ऑइलवरून घसरल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अनेक दुचाकीस्वार थेट रस्त्यावर कोसळले. विशेष म्हणजे, हा प्रकार एकाच वेळी घडला नाही, तर एकामागून एक दुचाकी घसरत गेल्या. अवघ्या अर्ध्या तासात 14 दुचाकींचे अपघात झाल्याने या मार्गावरील वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऑइलमुळे रस्त्याचा पृष्ठभाग निसरडा झाल्याने दुचाकीस्वारांना वाहन नियंत्रित करणे कठीण झाले. काही वाहनधारकांना अचानक दुचाकी घसरल्याने सावरण्याची संधीही मिळाली नाही. परिणामी, अनेक जण रस्त्यावर पडून जखमी झाले. या घटनेमुळे रस्त्यांची सुरक्षितता आणि संबंधित यंत्रणांच्या सतर्कतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. रस्त्यावर तेल किंवा इतर निसरडे पदार्थ सांडल्यास त्याची तातडीने स्वच्छता करणे आणि वाहनचालकांना पूर्वसूचना देणे आवश्यक असते. मात्र, अशा घटनांमध्ये वेळेत उपाययोजना न झाल्यास निष्पाप वाहनधारकांना त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित कधी होणार? मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणारी लोकल रेल्वे असो, बेस्टची बस असो किंवा शहरातील रस्ते असोत, प्रत्येक ठिकाणी प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकलमधील प्रचंड गर्दी, तांत्रिक बिघाड, रेल्वे रुळांवरील अपघात, बेस्ट बसच्या धडका आणि रस्त्यांवरील निष्काळजीपणामुळे नागरिकांचा रोजचा प्रवास धोकादायक बनत असल्याची भावना व्यक्त होत आहे. कांदिवलीतील घटनेने या समस्येत आणखी एका धोक्याची भर घातली आहे. रस्त्यावर ऑइल सांडणे ही घटना वरकरणी छोटी वाटत असली, तरी दुचाकीस्वारांसाठी ती जीवघेणी ठरू शकते. विशेषतः वाहतूक अधिक असलेल्या रस्त्यांवर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्यास काही मिनिटांत अनेक अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे रस्त्यांची नियमित तपासणी, ऑइल सांडल्याची माहिती मिळताच तातडीने स्वच्छता आणि धोकादायक ठिकाणी वाहतूक नियंत्रित करण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. कांदिवलीतील घटनेनंतर मुंबईकरांकडूनही प्रशासनाने अशा प्रकारच्या घटनांची गंभीर दखल घेऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली जात आहे. सहा दिवसांपूर्वी रेल्वे रुळांवरील अपघातांनी मुंबई हादरली दरम्यान, कांदिवलीतील घटनेच्या काही दिवस आधीच मुंबईच्या रेल्वे वाहतुकीला मोठा फटका बसला होता. कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळील सिग्नलिंग यंत्रणेशी संबंधित रिले रूममध्ये आग लागल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीत मोठा व्यत्यय निर्माण झाला होता. या आगीमुळे सिग्नलिंग यंत्रणा विस्कळीत झाली आणि मुख्य मार्गावरील लोकल सेवा अनेक तास प्रभावित झाली. काही लोकल गाड्या तब्बल 10 तासांपर्यंत अडकून पडल्याने हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला. लोकल सेवा विस्कळीत झाल्यामुळे अनेक प्रवाशांना रेल्वे रुळांवरून चालत इच्छित स्थळी जाण्याची वेळ आली. या गोंधळादरम्यान रेल्वे रुळांवर तीन जणांचे मृतदेह आढळल्याची माहिती समोर आली होती. घाटकोपर-विक्रोळी विभागात दोन मृतदेह आढळले, तर भांडुप येथे झालेल्या रेल्वे अपघातात आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. संबंधित व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडत असताना लोकलची धडक बसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. सिग्नलिंग यंत्रणा निकामी झाल्याने लोकल सेवा विस्कळीत कांजूरमार्ग स्थानकाजवळील सिग्नलिंग हटमध्ये आग लागल्याने कांजूरमार्ग आणि भांडुप स्थानकांदरम्यानच्या सहा रेल्वे मार्गांवरील जवळपास 24 सिग्नल प्रभावित झाले होते. परिणामी, मध्य रेल्वेच्या चारही लोकल मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला. सिग्नलिंग यंत्रणा पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासनाला मोठी कसरत करावी लागली. या बिघाडामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांचे नियोजन कोलमडले होते. सायंकाळपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात आली. एकीकडे लोकलमधील गर्दी आणि तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत, तर दुसरीकडे बेस्ट बस आणि रस्त्यांवरील अपघातही थांबण्याचे नाव घेत नाहीत. त्यातच कांदिवलीतील ऑइल सांडल्यामुळे झालेल्या अपघातांच्या मालिकेने मुंबईतील वाहतूक व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मुंबईकरांना सुरक्षित प्रवासाची हमी देण्यासाठी रेल्वे प्रशासन, वाहतूक पोलीस, महापालिका आणि संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची गरज व्यक्त होत आहे. हेही वाचा… दुष्काळाची दाहकता पाहून शरद पवारांचा मोठा निर्णय:तुळशी गावासाठी 50 लाखांची मदत, थेट धनादेश सुपूर्द राज्यातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असताना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दुष्काळग्रस्त गावासाठी थेट आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात असलेल्या तुळशी गावाला भेट देऊन तेथील पाणीटंचाई आणि दुष्काळाची तीव्रता जाणून घेतल्यानंतर पवार यांनी गावासाठी 50 लाख रुपयांची मदत जाहीर केली. केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष धनादेश देत त्यांनी गावकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या आणि अखेर गाव विक्रीला काढण्याची वेळ आलेल्या तुळशी गावासाठी पवारांची ही मदत महत्त्वाची मानली जात आहे. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *