![]()
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी भजनांतून बंधुभाव आणि धर्मसमभावाचा संदेश दिला. हा विचार केवळ बोलण्यापुरता न ठेवता व्यवहारात आणावा, असे माजी विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सांगितले. ते गुरुकुंज मोझरी येथील श्री गुरुदेव अध्यात्म गुरुकुलात बोलत होते. महाराजांच्या ५८व्या पुण्यतिथीनिमित्त येथे पालखी पदयात्रा शिबिर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत झालेल्या सर्वधर्म प्रार्थना संमेलनात मिटकरी बोलत होते. त्यांनी “या भारतात बंधुभाव नित्य वसु दे, दे वरची असा दे… नांदोत सुखी गरीब-अमीर एकमतानी, मग हिंदू असो, ख्रिश्चन वा हो इस्लामी” आणि “मंदिर मे भी है खुदा, मस्जिद मे भी राम है” या भजनांचा उल्लेख केला. कोणत्याही देशाची खरी ताकद एकतेत असते, असे मिटकरी म्हणाले. समाजात एकात्मता निर्माण करण्यासाठी प्रत्येक धर्म आणि व्यक्तीबद्दल समान भाव असणे गरजेचे आहे. त्यांनी संत, महापुरुष आणि विचारवंतांच्या विचारांचा दाखला देत सर्वधर्मसमभावाचे महत्त्व सांगितले. गुरुकुलात सुरू असलेल्या समाजप्रबोधनाच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. कार्यक्रमाच्या विचारपीठावर सनातन धर्माचे प्रतिनिधी नामदेवराव गव्हाळे, इस्लाम धर्माचे प्रतिनिधी इस्तियाक अहमद, ख्रिश्चन धर्माचे प्रतिनिधी नितीन सरदार, जैन धर्माचे प्रतिनिधी डॉ. मेघराज कोचर आणि बौद्ध धम्माचे प्रतिनिधी भदंत आनंद उपस्थित होते. प्रत्येक धर्माच्या प्रतिनिधींनी आपापल्या धर्मातील सर्वसमावेशकता, समता आणि मानवतेच्या मूल्यांबद्दल सांगितले. समाजातील वाढत्या धार्मिक विद्वेषाला नाकारून संतांचे समता, बंधुभाव आणि मानवतेचे विचार स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश्वर रक्षक यांनी प्रास्ताविक केले. सप्तखंजेरी वादक आकाश टाले यांनी सूत्रसंचालन केले.
Source link
मिटकरींनी धर्मसमभाव व्यवहारात आणण्याचे आवाहन केले:राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 58व्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरीतील संमेलनात माजी विधान परिषद सदस्यांचे प्रतिपादन