Headlines

लातूरमध्ये फ्लॅटमध्ये सुरू होता देहव्यापार:पोलिसांच्या बनावट ग्राहकाच्या मदतीने छापा, 21 वर्षीय तरुणीची सुटका




शहरातील मौलीनगर परिसरात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या देहव्यापाराच्या रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने कारवाई करत या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत 21 वर्षीय तरुणीची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर पोलिसांची चाहूल लागताच एक संशयित घटनास्थळावरून पसार झाला. सुटका करण्यात आलेल्या तरुणीला जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलण्यात आल्याची माहिती प्राथमिक चौकशीत समोर आली आहे. लातूर शहरातील मौलीनगर भागात एका फ्लॅटमध्ये बेकायदेशीररीत्या देहव्यापार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मात्र, केवळ माहितीच्या आधारे थेट छापा टाकण्याऐवजी पोलिसांनी आधी या माहितीची खातरजमा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शुक्रवारी पोलिसांनी एका व्यक्तीला ग्राहकाच्या वेशात संबंधित फ्लॅटमध्ये पाठवले. या व्यक्तीच्या माध्यमातून तेथे प्रत्यक्षात देहव्यापार सुरू असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने अचानक फ्लॅटवर धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांना फ्लॅटमध्ये एक 21 वर्षीय तरुणी आणि अन्य तीन जण आढळून आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात जावेद युसूफ सैयद आणि जयश्री राम तरोटे यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांची कारवाई सुरू असताना त्यांचा आणखी एक साथीदार घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत. नागपूरच्या तरुणीला जबरदस्तीने देहव्यवसायात ढकलले पोलिसांनी या फ्लॅटमधून सुटका केलेली 21 वर्षीय तरुणी मूळची नागपूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान तिने आपल्याला जबरदस्तीने देहव्यवसाय करण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगितले. या व्यवसायातून ग्राहकांकडून मिळणाऱ्या पैशांचे वाटप आरोपी आणि त्यांच्या अन्य साथीदारांमध्ये केले जात असल्याची माहितीही तरुणीने दिल्याचे समजते. त्यामुळे या रॅकेटमध्ये आणखी किती जण सहभागी आहेत आणि तरुणीला या व्यवसायात आणण्यामागे नेमके कोण होते, याचा तपास आता पोलिस करत आहेत. आर्थिक व्यवहार आणि रॅकेटच्या नेटवर्कचा तपास सुरू या प्रकरणात केवळ दोन आरोपींचाच सहभाग आहे की यामागे आणखी मोठे जाळे कार्यरत आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. ग्राहकांशी संपर्क कोण साधत होते, पैशांचे व्यवहार कशा पद्धतीने केले जात होते आणि या रॅकेटचे नेटवर्क इतर भागांपर्यंत पसरले आहे का, या सर्व बाबी तपासाच्या केंद्रस्थानी आहेत. तसेच फरार झालेल्या संशयिताचा शोध घेऊन त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. या प्रकरणी लातूरमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत संबंधित आरोपींविरोधात कारवाई करण्यात आली आहे. सध्या दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, सुटका करण्यात आलेल्या तरुणीबाबत पुढील कार्यवाही केली जात आहे. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या अन्य व्यक्तींचा शोध आणि संपूर्ण प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हेही वाचा… वरणगावमध्ये 23 वर्षीय डंपर चालकावर बेछूट गोळीबार:कामानिमित्त आलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून झाडल्या गोळ्या, प्रकृती चिंताजनक जळगाव जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर येत असतानाच भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. कामानिमित्त वरणगाव परिसरात आलेल्या 23 वर्षीय डंपर चालकाला अज्ञात हल्लेखोराने रस्त्यात अडवून त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. सायंकाळच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे वरणगाव शहरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सविस्तर वाचा…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *